Pune : ‘कोरोना’ला पुणेकरांनी घाबरू नये -महापौर; महापालिकेचा आता जनजागृतीवर भर

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असताना सर्व शक्यतांवर विचार करत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यात केलेली तयारी, प्रतिबंधात्मक साहित्यांची उपलब्धता आणि जनजागृती यावर सविस्तरपणे चर्चा झाली. शिवाय जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या आरोग्य विभागाशी समन्वय ठेऊन पुढील पावले उचलली जाणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सज्जतेनंतर आता जनजागृतीवर भर दिला जाणार असून त्यासाठी विविध माध्यमे वापरली जाणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेत मोहोळ यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी, पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासणे, आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असावा. तसेच कोरोनाचे काय वास्तव आहे? याचा आढावा घेऊन पुढे काय करावे? या संदर्भात बैठक घेण्यात आली. नागरिकांमध्ये गैरसमज, अफवा पसरू नयेत आणि योग्य ती माहिती नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेमार्फत जनजागृती करून शहरातील अनेक संस्था, वॉर्ड ऑफिसच्या पातळीवर एक पत्रक काढून जनजागृती केली जाणार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. शिवाय जनजीवन विस्कळीत होऊ नये, याचीही काळजी घेत आहोत.’

‘जिल्हाधिकार्‍यांनी मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा होऊ देणार नाही तसेच विभागामार्फत मोठ्या प्रमाणात त्याचा साठा ठेवला आहे. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत मास्क, सॅनिटायझर कमी पडू देणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरण्यापेक्षा काळजीवर भर द्यावा’, असेही मोहोळ म्हणाले.

पंतप्रधान आवास योजनेचा कार्यक्रम स्थगित…
२१ मार्च रोजी होणारा पंतप्रधान आवास योजनेचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येईल अशी माहितीही यावेळी मोहोळ यांनी दिली. या कार्यक्रमासाठी दोन ते तीन हजार व्यक्ती एका ठिकाणी येणार होत्या, त्यामुळे त्याची काळजी म्हणून तो पुढे ढकलला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना १३ सूचना…
महापालिकेच्या इमारतीत कामकाजावेळी काय काळजी घेतली पाहिजे? यासाठीच्या १३ सूचना सर्वांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.