Pune : पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’

एमपीसी न्यूज – नुकतीच सुरू झालेली पहाटेची गुलाबी थंडी… सभोवताली पसरलेली धुक्याची शाल… अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर… स्वर्गीय स्वर आणि भक्तिरसाचा आनंद देणारे सूर… अशी मंगलमयी सकाळ आज पुणेकरांनी अनुभवली. निमित्ता पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.

‘ऋत्विक फाऊंडेशन’ तर्फे ‘स्वर-प्रभात’ ही मैफल रविवारी कोथरूड येथील वेद भवनच्या मागे असलेल्या ऋत्विक फाउंडेशन (फॉर परफॉर्मिंग आर्ट्स) येथे झाली. या कार्यक्रमाचे संयोजन टाटा प्रोजेक्टस् यांच्या सहाय्याने करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ गायक पं. सत्यशील देशपांडे, ऋत्विक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडले, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना रुजुता सोमण आदि मान्यवर उपस्थित होते.

मैफलीची मंगलमयी सुरुवात पं. शैलेश भागवत यांच्या सनई वादनाने झाली. राग कोमल रिषभ असावारीने वादनाची सुरुवात करत त्यांनी वातावरणात चैतन्याची एक लहर पसरवली. आलाप, मिंड यांनी रसिकांची भरभरून दाद मिळविली. भल्या सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मैफलीला तेवढ्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुणेकर रसिकांनी दर्दी असण्याची पुन्हा एकदा पावती दिली. त्यानंतर त्यांनी राग मिया की तोडी सादर केला.

वादनातील सहजता आणि गायकी ढंगाचे वादन याला रसिकांकडून मिळणार्‍या भरभरून प्रतिसादला विनम्र साद घालत पं. भागवत यांनी संगीत नाटभैरव या १९५० च्याही आधीच्या संगीत नाटकातील ‘नारायणा रामरमणा…’ हे नाट्यसंगीत पेश केले. त्यांना तेजोवृष जोशी (तबला), मानसी महाजन (हार्मोनियम), विठ्ठल केंगार, केदार जाधव, शेखर परांजपे (सहवादन) यांनी साथसंगत केली.

उत्तोरोत्तर रंगत जाणार्‍या या मैफलीत स्वर्गीय आनंद ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने भरला. त्यांनी राग भैरव थाटने आपल्या गायनाची सुरुवात केली. धीरगंभीर सूरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. रागाचा विस्तार करत ‘तू भोला रे नाम पुकारे…’, ‘भोला रे…’, ‘हे शिव, हे महादेव, हे कलापती…’ या रचना त्यांनी पेश केल्या. टाळ्यांचा कडकडाट आणि वाह वा… ची उत्स्फूर्त दाद याने सभगृह भरावले होते. त्यानंतर राग जोनपूरमध्ये ‘हे शाम बासुरिया बाजे…’, ‘बाजे मोरी पायलिया…’ या रचना त्यांनी सादर केल्या.

राग बारवामध्ये ‘गुरुजी…’ ही रचना पेश करून जणू त्यांनी श्रोत्यांची फर्माईशच पूर्ण केली. पहाटेच्या रागांनी सुरू झालेली ही मैफल श्रोत्यांची तहान भागवत अखेर दुपारच्या रागाने समाप्त झाली. दुपारी १२ ची वेळ राम जन्माची समजली जाते म्हणून महाकवी तुलसीदास यांचे काव्य ‘सीतारामा…’ हे राग शुद्ध सारंग मध्ये पेश करत त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला.

यावेळी त्यांना मिलिद पोटे (तबला), ज्ञानेश्वर सोनावणे (हार्मोनियम), पल्लवी व आदिश्री पोटे (तानपूरा) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.