Pune : पुणेकर नागरिक कर भरण्याच्या बाबतीत जागृत- अनुराधा भाटिया

'आयसीएआय'तर्फे 'टीडीएस'वर मार्गदर्शन सत्र

एमपीसी न्यूज: ऐनवेळी कर भरण्यासाठी गेल्यास अनेक अडचणी, दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. त्यातून कर सल्लागार आणि करदात्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी आपण वेळेत कर भरायला हवा, असा सल्ला प्राप्तिकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) मुख्य आयुक्त अनुराधा भाटिया यांनी दिला. पुणेकर नागरिक कर भरण्याच्या बाबतीत जागृत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) यांच्या वतीने ‘टीडीएस’वर आयोजित मार्गदर्शन सत्रात भाटिया बोलत होत्या. बिबवेवाडी येथील ‘आयसीएआय’ भवन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे प्राप्तिकर आयुक्त आदर्श मोदी, मुंबईचे (टीडीएस) प्रताप सिंग, ‘आयसीएआय’च्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, खजिनदार काशिनाथ पठारे उपस्थित होते. वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांचेही या सत्राला सहकार्य लाभले.यावेळी विविध मान्यवरांनी टीडीएसमधील तरतुदी, कर कपात आणि तांत्रिक अडचणी याविषयी माहिती सांगितली. सनदी लेखापालांसह टीडीएस संबंधित अडचणी असणाऱ्यांना नागरिकांना यामध्ये सहभागी झाले होते. सीए ऋता चितळे यांनी प्रस्तावना, सीए अभिषेक धामणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

अनुराधा भाटिया म्हणाल्या, “कर वेळेवर भरण्याविषयी सतर्कता गरजेची आहे. टीडीएस चुकविणाऱ्यांना कडक कारवाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे सजग नागरिक बनून टीडीएस वेळेवर भरावा. ‘टीडीएस’ संदर्भात काही अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी विभागामार्फत त्यावर नियमित विचार होत असून, त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशासाठी करदात्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्यक्ष करामध्ये ४३ टक्के टीडीएसचा सहभाग आहे.”

आदर्श मोदी म्हणाले, “टीडीएस वेळेवर भरला जावा. तो भरण्याकरता दिरंगाई योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीकडून जर नियमानुसार नियमित कर भरण्यात आला, तर कोणालाच कोणत्याच प्रकारची समस्या येणार नाही. कर वेळेवर न भरल्यामुळे करदात्यांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. सीपीसी टीडीएस प्रणालीमुळे कर भरणे सोपे झाले आहे.”

प्रताप सिंग म्हणाले, ”कर प्रणालीचा वापर जगभरात केला जातो. आजच्या जगात सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांच काम करणे सोपे होत आहे. करदात्यांची माहिती ऑनलाईन देणे सोपे होत आहे. ऑनलाईन प्रणाली चांगली आहे. तसेच त्यांचे दुष्परिणामही आहेत. ई-कॉमर्स, रेल्वे, बँकिंग आदी विविध क्षेत्रात टॅक्स भरल्या न गेल्यामुळे उद्द्भविणाऱ्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. ऑनलाईन प्रणालीमुळे काही तक्रारीही येत आहेत. मागच्या दोन वर्षांत टीडीएस भरणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.