Pune : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुणेकर काळजीत

एमपीसी न्यूज : लॉकडाउनच्या काळात पुणे शहरातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झालेच आहेत. त्याहीपेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याने पुणेकर काळजीतही आहेत.

पुण्यात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. ती सध्या दिवसभरात रोज १०० रुग्ण अशी झाली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण रोज पाच ते सात असे राहिले आहे. या रुग्णांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी या घटकांचा समावेश आहे. शिवाय झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती या ठिकाणी साथीचा प्रादुर्भाव आढळून येतोय आणि तो नियंत्रणात येत नाही याची काळजीही अधिक आहे.

याचा परिणाम असा झाला की, दुकानदार अजूनही व्यवहार पूर्ववत सुरू करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सेवा क्षेत्रातील घटकही उत्पन्न बुडत असतानाही आपल्या कामापासून दूरच राहिले आहेत. ही साथ नजिकच्या काळात आटोक्यात येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनची मुदत वाढेल, अशी भीतीही पुणेकरांच्या मनात आहे.

शहरात धान्य, भाजीपाला, पशुखाद्य याची टंचाई आत्ताच भासू लागली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दीडपट, दुप्पट दराने वस्तू विकून धान्य व्यापारी, भाजीपाला आणि दूध विक्रेते ग्राहकांची अक्षरशः लूट करीत आहेत.

पुणे आणि परिसरात मे महिन्याच्या अखेरीस वळीवाच्या पावसाला सुरुवात होते. त्या दरम्यान हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप हे आजार डोंकं वर काढतात. त्यामुळेही पुणेकर आतापासूनच खूप काळजीत आहेत. प्रत्येकाच्या बोलण्यातून ही काळजी दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.