Pune : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे रविवारी 27 वी ‘दिवाळी पहाट’

पं. विजय घाटे, राकेश चौरसिया यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या ‘दिवाळी पहाट ‘संस्कृतीला सुरुवात करून देणाऱ्या ‘त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन ‘ ची सत्ताविसावी दिवाळी पहाट २७ ऑक्टोबर रोजी, रविवारी पहाटे साडेपाच वाजता होणार आहे. अवीट गोडीची अशी ही ‘दीप सूर तेजाळती’ ही स्वर-सूर-नृत्य -गायन मैफल असणार आहे.

या मैफलीत पं. राकेश चौरसिया यांचे बासरीवादन, पं. विजय घाटे यांचा तबला, शीतल लवालकर यांचे कथक नृत्य, श्रीधर पार्थसारथी यांचे मृदंग वादन, सुरंजन रघुनाथ यांचे गायन आणि श्रीराम हसबनीस यांचे हार्मोनियमवादन पुणेकर रसिकांना ऐकता येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘पहाट दिवाळीची,साथ सुरेल स्वरांची’ असा अनुभव देणाऱ्या या मैफलीदरम्यान शंभर वर्षे पूर्ण केलेल्या पुण्यातील दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महात्मा फुले वसतिगृह, डेक्कन मुस्लिम लायब्ररी आणि कँप एज्युकेशन सोसायटी या संस्थांचा सत्कार केला जाणार आहे. बाल्कनीतील प्रवेश विनामूल्य असून, तेथे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहेत.

‘त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले की, पहाट दिवाळीचा कार्यक्रम करण्यास प्रथम ‘त्रिदल ने १९९२ पासून सुरवात केली. आता विदेशातही मराठी लोक ‘दिवाळी पहाट कार्यक्रम करू लागले आहेत. संस्थेने या कार्यक्रमाचे वेगळेपणही जपले आहे.यात पाच पुणेकरांचा ‘पक्के पुणेकर’ असा सन्मान केला जातो.

गायिका किशोरी आमोणकर ते पंडित जसराज यांसारख्या दिग्गज कलाकारांनी ‘पहाट दिवाळी’ची मैफल आपल्या दिव्य स्वरांनी सजवलेली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात गायन-वादन केले आहे. या वर्षदेखील मैफलीत नावाजलेले कलाकार आहेत. त्यांच्या गायन-वादनाचा सुरेल आस्वाद रसिकांना घेता येणार आहे, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.