Pune : येवले चहासह इतर चहाच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासनाचे छापे

एमपीसी न्यूज – पुणे शहरात विनापरवाना आणि विनानोंदणी चहा विक्री करण-या व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार बुधवार पेठेतील प्रसिद्ध येवले अमृततुल्य चहा, नाना पेठ आणि धनकवडीतील साईबा चहा या चहाच्या दुकानावर दंडात्मक कारवाई करून चहा विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत जनहित आणि जनआरोग्य यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सुरेश देशमुख, सहआयुक्त (पुणे विभाग) यांच्या निर्देशानुसार संजय शिंदे सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी, इम्रान हवालदार आणि सोपान इंगळे यांच्या पथकाने केली.

  • तक्रार नोंदवण्याचे आवाहन
    अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार बंधनकारक आहे. अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ अंतर्गत कोणत्याही तरतुदीच उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास आणि किंवा कोणत्याही अन्न आस्थापनाबाबत तसेच अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत वाजवी तक्रार असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्र. १८०० २२२९ ३६७ वर संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, येवले चहाचे नवनाथ येवले यांना आम्ही या कारवाई संदर्भात विचारले असता, त्यांनी अशाप्रकारे कोणतेही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. आमच्या सर्व दुकानांसाठी नियमानुसार परवानगी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.