Pune Rain Update : स्वारगेट, मध्य पेठांसह शिवाजीनगर परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस !

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास जोरदार हजेरी लावली. वीजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह स्वारगेट, मध्य पेठांसह शिवाजीनगर परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

पुणे वेधशाळेने व्यक्त केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे परतीचा मॉन्सून एक आठवडा पाऊस बरसेल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

त्यानुसार आज सकाळी ऊन पडल्यामुळे नागरिक पाऊस पडणार नाही, असे समजून रेनकोट, छत्र्या न घेता घराबाहेर पडले. दुपारी एकच्या सुमारास निरभ्र असलेल्या आकाशात काळे ढग जमले आणि दोन सुमारास रिमझीम पाऊस सुरू झाला. दुपारी 3 वाजता पुढे तासभर मात्र वीजांच्या कडकडाटामुळे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.

परिणामी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्ते जलमय झाली तर रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने होऊ लागली. तासाभराच्या पावसामुळे निर्माण झालेल्या थंडाव्यामुळे उकाड्याने त्रस्त पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.