Pune Rain: वादळाच्या तडाख्याने वीजयंत्रणेचे मोठे नुकसान; पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात वीजपुरवठा विस्कळीत

pune rain updates Major damage to power circuits due to strong winds; Power supply disrupted in rural areas including Pune and Pimpri

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यात बुधवारी (दि.3) सकाळपासून सुरु असलेल्या ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.

यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला.

दरम्यान, वादळामुळे महावितरणच्या वीजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून त्याबाबतची स्थिती गुरुवारी (दि.4) सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. तसेच महावितरणचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे करीत आहेत.

आज रात्री उशिरापर्यंत खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मावळ, खेड तालुक्यांमधील राजगुरुनगर, चाकण, वडगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरातील 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरातील सर्व 215 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत वादळासह पावसाचे थैमान सुरु असल्याने वीजवाहिन्या पूर्ववत करण्याच्या कामात अडथळे येत होते.

पिंपरी-चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसल्याने बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद पडला. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांतील सुमारे 112 वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

पुणे शहरात वादळी पावसामुळे 85 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज आदी भागांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.