Pune Rains Update: पुण्यात पुन्हा एकदा ढगफुटी, शहर जलमय! सहकारनगर-धनकवडीत 227 मि.मी. पावसाची नोंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज –  पुण्यात रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ओढे-नाले यांना महापूर आले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावरील अनेक वाहने पाण्यात अडकून पडली आहेत. पावसाच्या हाहाकारामुळे पुणेकरांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागावी.  आजची संपूर्ण रात्र जागून काढावी लागण्याची शक्यता दिसत आहे. सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तर तब्बल 227 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज होणाऱ्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द केल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. शहरात पाणी साचल्यामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. शिरुर, अंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील पाणीच पाणी झाले होते.

पुण्यात मुसळधार पाऊस आणि अनेक भागातील वीज गायब झाली आहे. पाषाण, कर्वे नगर या भागातील वीज गायब आहे तर बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज माझे कुटुंब माझो जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे. तसेच पुणे -सोलापूर हायवे पावसामुळे बंद केला होता. उजनी धरणाचे पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर येथे हायवेवर आल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबवली होती. उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.

पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. मावळ तालुक्यातही रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग करावा लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे वेधाशाळेतील (शिवाजीनगर) नोंदीनुसार सकाळी साडेआठ ते रात्री साडेअकरा या वेळेत 96 मिलिमीटर पावसाची नोंद. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ 20 मिमी, रात्री साडेआठ ते साडेअकरा 76 मिमी. पावसाची नोंद झाली होती.

पुण्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका! तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.