Pune : राजेश पांडे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – भाजपच्या प्रदेश सचिवपदी राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी मकरंद देशपांडे यांचे सहप्रमुख म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवीन जबाबदारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पांडे यांनी १९९४ ते ९७ या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राज्य संघटन सचिव म्हणून काम पाहिले आहे. १९९८ ते २००४ या कालावधीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून २००३ ते २०१३ या कालावधीत जबाबदारी पार पाडली.

नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष म्हणून २००७ पासून कार्यरत असलेले पांडे सृजन, लोकमान्य शिक्षण मंडळ, अंमळनेर, विद्यापीठ विकास मंच या संस्थांचे विश्‍वस्त आणि वनसंपदा बहुउद्देशिय मंडळाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

कौशल्य विकास कार्यकमाअंतर्गत दरवर्षी ४० हजार विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्याचे काम ते करीत आहेत. सन २०१३ ते २०१६ या कालावधीत ते पुणे शहर भाजपचे सरचिटणीस होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.