Pune : रॅपिड अँटिजेन टेस्ट पुणेकरांच्या फायद्याची – महापौर

Rapid Antigen Test Benefits Punekars - Mayor

एमपीसी न्यूज – रॅपिड अँटिजेन टेस्ट   पुणेकरांच्या फायद्याची आहे. या टेस्टमुळे कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह याचे निदान केवळ अर्ध्या तासात कळणार आहे. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्येही दाखल रुग्णांची ही टेस्ट करण्यात यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

उद्या, बुधवारपासून या किटद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी महापौरांना आज, मंगळवारी दिली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.

पुणे शहरातील 15 स्वाब सेंटरमध्ये ही तपासणी करण्यात येणार आहे, असे अंजली साबणे यांनी सांगितले. पुणे महापालिकेतर्फे अशा 1 लाख किट खरेदी करण्यात आल्या आहेत. यातील एका किटचा खर्च 450 रुपये आहे.

महापौर म्हणाले, पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या प्रमाणात चाचण्याही वाढविण्यात येत आहेत. सोमवारी तब्बल 4 हजार पेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या. याला एक जोड म्हणून आयसीएमआर मान्यता असलेल्या या एक लाख टेस्ट किटची खरेदी महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.

यापूर्वी कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल यायला 2 ते 3 दिवस लागत होते. ते काम आता केवळ अर्ध्या तासात होणार आहे. गर्भवती महिलांसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. त्यांची आधी टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग ज्या भागांत मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी या किटचा वापर करण्यात येणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.