Pune : रेशन दुकानदार बेमुदत संपावर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल

Ration shopkeepers go on indefinite strike The condition of ordinary citizens

एमपीसी न्यूज – विमा संरक्षणासह आपल्या विविध मागण्यांची पूर्तता करावी, या मागण्यांसाठी रेशन दुकानदार बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र लोकडाऊन असताना जीवाची पर्वा न करता रेशनिंग दुकानदार धान्य वाटप करीत होते. परंतु, त्यांना शासनाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. विश्वासात न घेता अनेक निर्णय लादले जातात. नुकताच कोरोनामुळे एका रेशनिंग दुकानदाराचा मृत्यूही झाला. त्यामुळे राज्यभरातील रेशन दुकानदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

Epos मशीनवरील थम बाबत phh च्या ग्राहकांप्रमाणे पोर्टबिलिटी ग्राहकांचे थम तात्काळ रद्द करावे, कारण ते जीवघेणे ठरत आहे. कोरोना जाईपर्यंत या मशीनवरील थम चालू करू नये. प्रति महिना प्रति कार्ड 100 रुपये प्रमाणे मानधन देण्यात यावे. कोरोनाची परिस्थिती पाहून धान्य वाटप करण्यास मुभा द्यावी, अशी रेशन दुकानदारांची मागणी आहे.

तसेच  दुकानदारांवर अधिकाऱ्यांनी दबाव आणू नये. हॅन्डग्लोज, मास्क, सॅनिटायजर शासनाने पुरवावे. रेशनिंग दुकानदार आणि अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात यावी. रेशन दुकानदारांना पोलिसांचे सहकार्य मिळावे, apl चे धान्य वाटप स्थानिक लोकप्रतिनिधिंकडे देण्यात यावे. दुकानदारांना 10 लाख रुपये विमा व विशेष आर्थिक सहकार्य मिळावे, अशा विविध मागण्या रेशनिंग दुकानदारांनी केल्या आहेत.

या मागण्यांचे निवेदन एफडीओ, जिल्हाधिकारी, अन्नधान्य पुरवठा अधिकारी, परिमंडळ अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात रेशन दुकानदारांनी अशाप्रकारे बेमुदत संपावर जाणे बरोबर नाही. या दुकानदारांच्या बाबतीत तक्रार आल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिला आहे.

तर मागील 8 दिवसांपासून रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांचा विचार करा, मात्र त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका, अशी मागणी पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.