Pune : केंद्र आणि राज्य सरकारी यंत्रणेने रेशनिंगचा आढावा घ्यावा -सुभाष वारे

एमपीसी न्यूज : कोरोना प्रादुर्भावाची दखल घेऊन केंद्रीय पथक नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी कोरोना साथीचा आढावा घेतला. आता केंद्र आणि राज्यातील सरकारी यंत्रणेने रेशनिंग व्यवस्थेचाही आढावा घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केली आहे.

हातावर पोट असलेल्या नागरिकांकडून रेशनिंग व्यवस्थेबाबतच्या तक्रारी सातत्याने कानावर येत आहेत. याकरिता रेशनिंगची दुकाने, वाड्या-वस्त्या येथे जावून केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकाने पाहाणी करावी, तेथील नागरिकांशी संवाद साधावा. यामाध्यमातून सरकारला सध्याचे रेशनिंग वितरण प्रणालीचे वास्तव समजेल आणि त्यादृष्टीने उपाययोजना करता येतील, असे वारे यांनी म्हटले आहे.

राज्यातील मजूर वर्गाचे पोषण नीट झाले नाही तर त्यांच्यात प्रतिकार शक्ती कशी निर्माण होईल, असा सवाल वारे यांनी केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते निर्बंध सर्वांनी पाळले पाहिजेतच. त्याचबरोबर उपासमार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीच्या हालचाली करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

रेशन कार्ड नसलेले स्थानिक मजूर, छोटे व्यावसायिक, पर राज्यातील मजूर हे स्वयंसेवी संस्था, समाजसेवी नागरिकांचे गट यांच्याकडून होणाऱ्या अन्न आणि कोरड्या शिध्यावर अवलंबून आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवी नागरिक यांची मदत पोहोचविण्याची ताकद, क्षमता हळूहळू कमी होत आहे.

त्यांच्याही फिरण्यावर मर्यादा येत आहेत. अनेक ठिकाणी पोलीसांच्या बदलत्या स्वरुपातील निर्बंध व कारवाईमुळे मदत करणारेही माघार घेत आहेत. याची दखल केंद्रीय पथक आणि राज्य सरकारी यंत्रणेने घेऊन तातडीने कारवाई करायला हवी, असे वारे यांनी सुचविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.