Pune : महानगरपालिका आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यातील ‘सामंजस्य करार’मुळे 280 बेड्सची सोय

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि लता मंगेशकर मेडिकल फौंडेशनचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यामध्ये ‘सामंजस्य करार’, संपन्न झाला. त्यामुळे आता 280 बेड्सची सोय उपलब्ध होणार आहे.

हा करार करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच मान्यता दिलेली होती. या करारावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने विश्वस्त व वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सह्या केल्या.

याप्रसंगी पुणे मनपाच्या सहाययक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. भट उपस्थित होते. या करारानुसार शहरातील व पुणे मनपाने शिफारस केलेले पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्ण यांच्या उपचाराकरिता रुग्णालयात 125 बेड व अतिदक्षता विभागातील 15 बेड आरक्षित करण्यात येतील. शासनाच्या योजनेनुसार रुग्णालय उपचार करणार आहेत.

या व्यतिरिक्त 125 बेड आयसोलेशन करिता व 15 बेड आयसीयु करिता आरक्षित करण्यात येतील. रुग्णास डिस्चार्ज दिल्यानंतर येत्या तीन महिन्यांत पुणे मनपाच्या वतीने बिलांची पूर्तता केली जाईल.

रुग्ण दाखल झाल्यानंतर सर्व जबाबदारी रुग्णालयाची राहील. रुग्णालयास आवश्यकतेनुसार पीपीई किट्स, एन-95, मास्क वितरित करण्यात येतील, असे पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.