Pune : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ च्या तिकीट दारात कपात

मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा; नवे तिकीटदर ८ जुलैपासून लागू, दादर-पुणे स्टेशन तिकीट आता 440 रुपये

एमपीसी न्यूज – मुंबई -पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावल्लौकीक असलेल्या ‘शिवनेरी’ व ‘अश्वमेध’ या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयापर्यंत भरघोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेली नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे 8 जुलैपासून लागू होणार आहेत.

गेली 15 वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची “शिवनेरी’ ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळण-वळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 07 मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात 435 फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे टीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे.

  • या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन ही प्रतिष्ठीत सेवा सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीटदर कमी केल्यामुळे हा प्रवाशी वर्ग सुध्दा शिवनेरीकडे वळेल.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करुन स्पर्धात्मक तिकीटदर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून कमी झालेले नवीन तिकीट दर लागू होतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.