Pune : संस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार; परदेशातून आलेल्या नागरिकावर गुन्हा दाखल

Refusal to become institutional quarantine; Filing a case against a citizen from abroad

एमपीसी न्यूज – शासनाच्या नियमानुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. क्वारंटाईन न झाल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. हवेली तालुक्यातील हांडेवाडी येथे परदेशातून आलेल्या एका व्यक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अश्विन कुमार सिंग (वय 31, रा. (हांडेवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रगती उल्हास कोरडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या 24 मे 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे.

असे असताना अश्विन सिंग 16 जून रोजी विमानाने लंडन येथून मुंबईला आले. त्यानंतर ते हवेली तालुक्यातील हांडेवाडी या त्यांच्या गावात परस्पर निघून गेले.

पुणे महापालिकेचे नोडल अधिकारी अजित सणस यांनी घरी जाऊन अश्विन सिंगला समजावून सांगितले. तरीही सिंग याने संस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार दिला.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्या आदेशावरुन सिंग याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51, महाराष्ट्र कोविड 19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.