Pune : ‘कोरोना’ प्रतिबंधाबाबत खासगी रुग्णालयांच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज, शुक्रवारी (दि. 3) पुण्यातील खासगी हॉस्पीटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भात खासगी हॉस्पिटलकडून सुरू असलेली तयारी व कोरोनासंदर्भात प्राधान्यक्रम कसा असावा तसेच उपाययोजनांबाबतचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदीसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनपूर्वक जात आहोत. कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. खासगी डॉक्टरांचाही यातील सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. कोरोना उपचाराबाबत प्राधान्यक्रम महत्त्वाचा आहे. जैववैद्यकीय कच-याचे व्यवस्थित संकलन करून प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनेही आपला प्रयत्न आहे.

तसेच खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्तदेखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खासगी आस्थापना मिळून काम करू व यातून आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पुण्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख, डॉक्टर्स तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.