Pune : परदेशातून आलेल्या नागरिकांना नोंदणी अनिवार्य; त्वरीत ऑनलाइन माहिती देण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे महापालिका प्रशासनाने अधिक खबरदारीची पाऊले उचलली आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन एक मार्च आणि त्यानंतर परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन प्रशासनास माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशा नागरिकांनी नाव नोंदणी करणे अत्यावश्यक असून www.idsp.mkcl.org या लिंकवर जाऊन त्वरीत माहिती द्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉक्टरांनाही अशा नागरिकांची माहिती प्राप्त झाल्यास तेही वरील लिंकवर लॉग इन थेट माहिती भरू शकतात. आपल्या प्रियजनांच्या, संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी व डॉक्टरांनी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

जगभरात अनेक देशांमध्ये करोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. योग्य उपचार करून काही जण बरे देखील होत आहेत. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन विविध पातळ्यांवर अशा व्यक्तींचा मागोवा घेणे, नंतर त्यांची तपासणी आणि योग्य उपचार करण्याच्या दृष्टीने प्रशासन सुरवातीपासून प्रयत्नशील आहे. मात्र, काही नागरिकांनी परदेशातून आल्यानंतर पूर्ण माहिती प्रशासनास दिलेली नाही.

त्या अनुषंगाने पुणे महानगर पालिकेकडून एक मार्चनंतर परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परदेशातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचा संपूर्ण माग काढणे किंवा शोध घेणे यंत्रणेला शक्य आहेच. यासाठी केंद्र, राज्य सरकार, महापालिका, पोलिस व जिल्हा प्रशासन संयुक्तपणे काम करत आहे. मात्र नागरिकांनी स्वतःहून आपल्याबद्दल माहिती दिल्यास त्यांच्या व सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे.

दरम्यान, “प्रशासनाने माग काढून आपल्या घरापर्यंत येण्याची वाट न पाहता परदेशातून परतलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.