Pune : लॉकडाऊन शिथिल करा, अन्यथा भूकबळी होण्याची भीती : डॉ. सिद्धार्थ धेंडे

एमपीसी न्यूज – आगामी काळात लॉकडाऊन कडक करण्यापेक्षा शिथिल करा, अन्यथा भूकबळी, उपासमारीमुळे इतर आजार होण्याची भीती माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे व्यक्त केली आहे.

शहरातील झोपडपट्ट्या, जुन्या पेठांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या भागांत कामगार, मजूर, कष्टकरी, शहर स्वच्छ करणारे सेवक, रिक्षा, टेम्पो, ओला – उबेर चालक, पथारी व्यावसायिक, असे सर्वसामान्य पुणेकर राहतात. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यात त्यांच्याकडे होते नव्हते ते आता संपले आहे.

त्यामुळे आता लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यापेक्षा ती शिथिल करावी. आजाराला प्रतिबंधात्मक उपाय करून या नागरिकांना व्यवसाय करण्यास मुभा द्यावी. जेणेकरून त्यांची रोजीरोटी चालू राहील. महापालिका तसेच राज्य शासनावर पडणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.

या नागरिकांना अन्नसुरक्षेच्या माध्यमातून धान्य देण्यात येत आहे. पुणे शहरात 6 लाखांच्यावर केशरी कार्डधारक आहेत. या नागरिकांना भिलवाडा पॅटर्न नुसार समूह संघटिका यांच्या मार्फत रेशन देण्यात यावे. झोपडपट्ट्यात कोरोना वाढण्यास सुलभ शौचालयात होणारी गर्दीही कारणीभूत आहे. एका शौचालयामागे 200 नागरिक त्याचा वापर करतात.

त्याठिकाणी हात धुण्यासाठी सॅनिटायजर मशीन लावण्यात यावे. कोरोना असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्यात याव्यात. या टेस्ट महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात. त्यामुळे संबंधित रुग्णाला तातडीने होम कोरोंटाईन करता येईल, अशा अनेक उपाययोजना करण्याची मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.