Pune : जातीधर्माच्या आधारे निष्पाप व्यक्तींची हत्या करणारेच दहशतवादी : राहुल डंबाळे

रिपब्लिकन युवा मोर्चाच्या लोकसंवाद यात्रेला पुणे जिल्हयात चांगला प्रतिसाद

 

एमपीसी न्यूज- जाती-धर्माच्या आधारे संघर्ष छेडत मॉब लिंचींग व अन्य प्रकारे निष्पाप लोकांची हत्या करणारेच खरे दहशतवादी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मॉब लिंचींग विरोधी कायद्याची निर्मिती करावी,असे प्रतिपादन रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे यांनी केले.

रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित लोकसंवाद यात्रा अंतर्गत पुणे लोणी काळभोर येथे दलित-आदिवासी अत्याचार व मॉब लिंचिंग विरोधी परिषदेचे आयोजन 11 ओगस्ट रोजी करण्यात आले होते.

राहुल डंबाळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इंडियन मुस्लिम फ्रंट चे संस्थापक मुनवर कुरेशी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे विठ्ठल गायकवाड, तसेच युवक क्रांती दलाचे राज्य समन्वयक जांबुवंत मनोहर, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अश्विन दोडके, रुपाली काळभोर, विजया खांडेकर, प्रकाश लांडगे, आनंद रणधीर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटना तसेच अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांवरील हल्ले रोखण्यात राज्य सरकारला पूर्णतः अपयश आले असून, या घटनातील आरोपींना कठोर कायदेशीर शिक्षा व्हावी या प्रकारचे कोणतीच कृती सरकार कडून दिसत नाही. त्यामुळे सरकार बद्दल दलित व अल्पसंख्यांक समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराज असून येत्या निवडणुकांमध्ये याची गंभीर किंमत सरकारला चुकवावी लागेल,असे प्रतिपादनही राहुल डंबाळे यांनी केले. तसेच लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील किमान 50 हजार दलित आदिवासी व अल्पसंख्यांक तसेच अन्य पुरोगामी धर्मनिरपेक्ष व्यक्तींशी संवाद साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार हे केवळ मुस्लिम द्वेषावर आधारित राजकारण करत असून सुप्रीम कोर्टाचा आपल्या सोईप्रमाणे अर्थ लावत ट्रिपल तलाक आणि शबरीमाला प्रकरणी वेगवेगळी भूमिका घेत आहे. खरंतर सरकार म्हणून सर्वांना विश्वास देणे याऐवजी सरकार दलित व अल्पसंख्यांक समुदायावर दहशत पसरवत असल्याचा आरोप इंडियन मुस्लिम फ्रंटचे मुनवर कुरेशी यांनी केला.

फडणवीस सरकारची एकूण पाच वर्षांची कारकीर्द ही अत्यंत निराशाजनक असून निवडणूक जिंकण्यासाठी ठोस असे अशी कोणतीच कामगिरी नसल्याने फोडाफोडीचे राजकारण तसेच धार्मिक कट्टरता वादाचे राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरेल. कारण जनता पूर्णपणे सरकारविरोधी मानसिकतेत असून निवडणुकांमध्ये सरकारला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु सरकारचा जनता व कामापेक्षा ईव्हीएम वर अधिक भरोसा असल्याने ते निर्धास्त आहेत. अशी टीका युवक क्रांती दलाचे राज्य समन्वयक जांबुवंत मनोहर यांनी केली.

या संवाद यात्रेच्या माध्यमातून रिपब्लिकन व आंबेडकरी चळवळीतील नवतरुणांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न यशस्वी होईल असा विश्वास रिपब्लिकन नेते विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विन दोडके यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष रफिक इनामदार यांनी केले. आभार शाखा अध्यक्ष स्नेहलताई कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन शाहरुख तांबोळी, इसाक पठाण, आदर्श डंबाळे, योगेश काकडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.