Pune: नवरा-बायकोचे भांडण सोडवणे शेजाऱ्याला भलतेच महागात पडले

Pune: Resolving husband-wife quarrel cost the neighbor dearly नवरा-बायकोच्या भांडणात पडल्याचा राग आल्याने आरोपीने तुळशीराम यांच्या डोक्यावर आणि पाठीवर काठीने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचे डोके फुटले.

एमपीसी न्यूज- नवरा-बायकोचे घरात सुरू असणारे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणे एका शेजाऱ्याला चांगलेच महागात पडले. यातील नवऱ्याने आपले भांडण विसरून नंतर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यालाच मारहाण केली. इंदापूर तालुक्यातील पळसदेव माळवाडी या गावात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मारहाण झालेल्या 65 वर्षीय शेजाऱ्याने याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सायंकाळच्या वेळी घरासमोरच्या ओट्यावर बसले होते. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारे वसंत बनसोडे आणि त्यांच्या पत्नीमध्ये जोरात भांडण सुरू होते.

फिर्यादी तुळशीराम बनसोडे हे त्यांच्या घरात गेले आणि सायंकाळी भांडण करू नका असे सांगितले. दरम्यान, नवरा-बायकोच्या भांडणात पडल्याचा राग आल्याने आरोपीने तुळशीराम यांच्या डोक्यावर आणि पाठीवर काठीने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचे डोके फुटले. डोक्यास टाके पडले आहेत.

या सर्व प्रकारानंतर तुळशीराम बनसोडे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.