Pune : रिटेलमधील परकीय गुंतवणुकीच्या विरोधार्थ रिटेल व्यापाऱ्यांची दुचाकी रॅली

'आम्ही पण मतदार'; रिटेल व्यापाऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा

एमपीसी न्यूज- देशातील रिटेल व्यवसायामध्ये 100 टक्के परकीय गुंतवणूकीस केंद्र सरकारने परवानगी दिल्याने आधीच मॉलमुळे त्रस्त झालेला रिटेल व्यापारी आता उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचे आंदोलन केले. पुण्यात आंदोलना दरम्यान ‘आम्ही पण मतदार’ अशा आशयाचे फलक हातात घेत सरकारला एक प्रकारे इशारा देत रिटेल व्यापाऱ्यांनी दुचाकी रॅली काढली.

रिटेलमधील परकीय गुंतवणुकीमुळे वॉलमार्ट, अलीबाबा, फ्लिपकार्ट या कंपन्या रिटेल व्यवसायात येत आहेत. यामुळे देशातील रिटेल व्यापारी उध्वस्त होणार आहे. या निर्णयाविरोधात देशभरात सीएआयटी संघटनेच्या वतीने आज भारत बंदचे आंदोलन पुकारले होते. त्यास पाठींबा म्हणून पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने सारसबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. गणपतीची आरती करुन बाजीराव रस्त्याने मंगळवार पेठेतील जुन्या बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही दुचाकी रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

वॉलमार्टसारख्या कंपन्यांना व्यवसायासाठी 2 टक्क्यांनी कर्ज मिळते तर, आपल्याकडे कर्जावरील व्याजाचा दर 9 ते 18 टक्के आहे. मॉलच्या स्पर्धेत कंबरडे मोडलेला रिटेल व्यापारी या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी कशी स्पर्धा करणार ? देशात 35 कोटींहून अधिक नागरिक रिटेल व्यवसायातून रोजगार मिळवून जगतात. आणि आपले केंद्र सरकार 7 कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी 35 कोटी लोकांच्या रोजगाराला संकटात आणून रिटेल व्यवसायात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहे. इतका साधा व सरळ विचार केंद्र सरकारच्या लक्षात येत नाही हेच विशेष आहे. आजच्या घडीला अमेरिकेने कायदा करून देशांतील व्यापाराला संरक्षण दिले आहे. चीन, रशिया सर्वजण स्थानिकांना प्रथम प्राधान्य देत असताना आपले सरकार मात्र स्थानिक रिटेल व्यवसाय संपविण्याचे काम करीत आहे असे गाऱ्हाणे रिटेल व्यापाऱ्यांनी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.