Pune River : पाच नद्यांचं नैसर्गिक वरदान लाभलेलं महानगर!

पर्यावरण दिन विशेष

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून जाणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प काय आहे, कसा आहे, त्याचे परिणाम काय होतील, या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे शोधणे ही केवळ परिस्थितीची गरज नाही तर आपली जबाबदारीच आहे… पर्यावरण क्षेत्रातील लढवय्ये कार्यकर्ते, आर्किटेक्ट, पुणे शहर विकास आराखडा नियोजन समितीचे सदस्य व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये नद्यांवरील (Pune River) अतिक्रमणे आणि प्रदूषणाच्या विरोधात अनेक दावे दाखल करणारे सारंग यादवाडकर यांचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष लेख!


पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प (भाग- एक) : लेखक – सारंग यादवाडकर

पुणे!
शहरातून पाच नद्या वाहत असणारे,
शहराच्या नजीक उर्ध्व बाजूस सात धरणे असणारे,
चहू बाजूंनी हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले,
आणि या सर्वामुळे दुष्काळात सुध्दा मुबलक पाणी असणारे कदाचित एकमेव महानगर!

Pune River
आपल्या हा संपन्न वारसा टिकवलाच पाहिजे

ह्या मुबलक पाण्यामुळेच पुणे शहराची फार मोठ्या वेगाने वाढ झाली. परंतु ह्याच परिस्थितीची दुसरी बाजूही आपण अनेक वेळा पाहिली आहे आणि अनुभवली सुध्दा आहे. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर 2019 साली आंबिल ओढ्याला आणि नद्यांना आलेल्या पुरांचं आहे. अवघ्या काही तासांतच शेकडो घरे उद्‌ध्वस्त झाली, करोडो रुपयांचं नुकसान झालं आणि 25 निष्पाप नागरिकांना प्राण गमावावे लागले. सर्व नाल्यांचे आणि नद्यांचे पाणी पूर पातळ्या ओलांडून शेकडो घरांमध्ये अगदी हॉस्पिटलमध्येही शिरले होते. नंतर 2020 साली भेरोबा नाल्याने सुध्दा असेच रौद्र रूप धारण केले होते.

हे असे का होत आहे?
पूर्वी देखील असेच होत होते का?
भविष्यातही असेच पूर येणार का?
ह्याला जबाबदार कोण आहे?
प्रश्न अनेक आहेत.

Pune River

पण खरा प्रश्न, आपण ह्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधणार? हा आहे. ह्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या पैलूंचा विचार करावा लागेल.
वर उल्लेख केल्याप्रमाणे पुण्यातून छोट्या मोठ्या पाच नद्या वाहतात, मुळा, मुठा, पवना, रामनदी आणि देवनदी. या पाचही नद्यांचे संगम होऊन, त्या पुण्यातून मुळा-मुठा ही एक नदी होऊन बाहेर पडतात.

थोडक्यात, पाच वेगवेगळ्या पाणलोट क्षेत्रातून पुण्यात पाणी येते परंतु त्याला बाहेर पडायला मात्र मुळा-मुठा नदी (Pune River) हा एकच मार्ग आहे. यात भरीस भर म्हणून, पुणे शहराची भौगोलिक रचना एखाद्या बशी सारखी आहे. जोरात पाऊस सुरू झाला की चहू बाजूंनी शहराच्या मध्यभागाकडे वेगाने पाणी वाहायला लागते आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते.

पुण्यालगत सात धरणे

या नद्यांवर पुण्याच्या उर्ध्व बाजूला एकूण सात धरणे आहेत, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, मुळशी आणि कासारसाई. यातली महत्वाची बाब म्हणजे ही सर्व धरणे पुण्यापासून तर जवळ आहेतच परंतु ती एकमेकांपासूनही फार लांब नाहीत.

याचा साधा अर्थ असा, की जर यदाकदाचित पुण्याच्या पश्चिमेला ढगफुटी झाली तर ती एकाच वेळेला या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होईल आणि जर तसे झाले तर या धरणांमधून मोठा विसर्ग सोडावा लागेल आणि या विसर्गाचा लोंढा अवघ्या काही मिनिटांत पुणे शहरावर येऊन धडकेल.

या सर्व नद्यांचेच (Pune River) नव्हे तर पुण्यातील ओढ्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पाणलोट क्षेत्रांचे स्वरूप. ही सर्व पाणलोट क्षेत्रे डोंगर दऱ्यांची आणि तीव्र उताराची आहेत. अर्थातच त्यामुळे पावसाचे पाणी खूप वेगाने नदी किंवा ओढ्यांकडे धावते आणि काही कळायच्या आधीच पूर पातळी वाढते. रामनदीच्या किंवा आंबिल ओढ्याच्या पुरांनी हे सप्रमाण सिद्ध केलेच आहे.

Pune River
उन्हाळ्यातही नदीचा काठ हिरवाईनं नटलेला असतो.

पावसाचे प्रमाण 37.5 टक्क्यांनी वाढणार?

या संदर्भात अजून एक महत्वाची बाब लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. The Energy and Resources Institute (TERI) या संस्थेने 2014 साली महाराष्ट्र शासनाला “Maharashtra State Adaptation Action Plan” नावाचा एक अहवाल तयार करून दिला आहे. या अहवालात जागतिक तापमान वाढीमुळे महाराष्ट्र राज्यावर होणाऱ्या परिणामांवर सखोल चर्चा करून त्यावर शास्त्रीय मार्ग आणि उपाय सांगितले आहेत.

या अहवालात स्पष्ट शब्दात असा इशारा दिला आहे की, भविष्यात पुण्यामध्ये पावसाचे प्रमाण 37.50 % वाढणार आहे आणि याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ढगफुटीही होणार आहेत. याचा अर्थ एकच, भविष्यात आपल्याला अजूनही मोठ्या आणि गंभीर पूरपरिस्थितींना तोंड द्यावे लागणार आहे.

गेल्या 20-25 वर्षामध्ये पुण्यातील सर्व नद्यांची परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे. लोकसंख्या आवाक्याबाहेर वाढली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर सांडपाणी निर्माण होत आहे परंतु महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता आणि कार्यक्षमता अनेक कारणांमुळे अत्यंत तोकडी पडत आहे. याचा परिणाम म्हणून आज पुण्यातील सर्व नद्यांमधून फक्त सांडपाणीच वाहत आहे.

Pune River
नदीत मिसळणारे सांडपाणी रोखणे गरजेचे आहे.

औद्योगिक प्रदूषणाची भर

नद्यांमध्ये मूळचा नैसर्गिक प्रवाह शिल्लकच राहिलेला नाही. या मध्ये भर पडत आहे ती औद्योगिक प्रदूषणाची. मुख्यतः मुळा नदीत हे प्रदूषित पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहे, की राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळे अस्तित्वात आहेत की नाहीत, असा प्रश्न पडतो.

पुण्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे तर आपण सर्व रोजच पहात आहोत. कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया दूरच परंतु कचऱ्याचे एकत्रीकरणही संपूर्णपणे होत नाही. नागरिक कुठेही कचरा टाकत असतात. हा सर्व कचरा, मुख्यतः त्यातील प्लास्टिक शेवटी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येऊन नदीतील प्रदूषणात आणखी भरच घालते. हेच प्लास्टिक अनेक ठिकाणी पावसाळी पाण्याच्या गटारांमध्ये अडकून मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते.

ओढे व नद्यांची वहनक्षमता

याव्यतिरिक्त अजून एक महत्वाची बाब म्हणजे पुण्यातील सर्व नद्यांची आणि ओढ्यांची वहनक्षमता फार मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. याआधी आपल्याला नदीच्या पूररेषा समजावून घेणे अत्यावश्यक आहे. नदीच्या दोन्ही काठांवर दोन प्रकारच्या पूररेषा असतात, निळ्या आणि लाल. निळ्या पूररेषा दर 25 वर्षांनी येणाऱ्या पुराची पातळी दर्शवितात तर लाल पूररेषा दर 100 वर्षांनी येणाऱ्या पुराची पातळी दर्शवितात.

River Plogathon : प्लास्टिकमुळे नदीरुपी मातेचे अतोनात नुकसान – आयुक्त राजेश पाटील

दोन्ही निळ्या पूररेषांमधील नदीपात्र हे “निषिद्ध क्षेत्र” मानले जाते, या भागात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तसेच नदीच्या दोन्ही काठांवरील निळ्या आणि लाल पूररेषा मधील भाग हे “नियंत्रित क्षेत्र” मानले जाते, या भागात काही अटींवरच बांधकाम करता येते. कोणत्याही परिस्थितीत नदीचा काटछेद (Cross Section) कमी करता येत नाही, ज्यामुळे नदीची वहनक्षमता कमी होईल.

नदी पात्रातील अधिकृत व अनधिकृत बांधकामे

पुण्यात आणि भोवताली नदीपात्रात आणि ओढ्यांमध्ये अगणित ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत. यातील बरीचशी अतिक्रमणे अनधिकृत आहेत परंतु कित्येक अतिक्रमणे अधिकृतही आहेत. उदा. नदीपात्रातील वाहनतळ, चौपाटी, सांडपाण्याचे पाईप्स, नदीपात्रातील मेट्रो इ. या सर्व अतिक्रमणांमुळे नदीपात्राचा काटछेद अनेक ठिकाणी कमी झालेला आहे. अर्थातच जेवढ्या प्रमाणात काटछेद कमी झाला आहे.

Pune River
नदीचे हे खडकाळ किनारे अनेक जीवांचे आश्रयस्थान आहे.

तेवढ्या प्रमाणात नदीची वहनक्षमताही त्या त्या ठिकाणी कमी झालेली आहे. याचा परिणाम आपण बघतोच आहोत. 1997 साली खडकवासला धरणातून 90 हजार क्युसेक्स (घनफूट प्रति सेकंद) प्रवाह सोडल्यावर जी पातळी पाण्याने गाठली होती तीच पातळी 2011 साली 67,212 क्युसेक्सच्या प्रवाहाने गाठली. निळी पूररेषा, जी 60 हजार क्युसेक्सच्या प्रवाहाला निश्चित केलेली आहे ती 45,474 क्युसेक्सच्या प्रवाहाने 2019 साली ओलांडली.

हृदयविकाराच्या झटक्याची वाट पाहणार का?

या सगळ्याचा मतितार्थ एकच आहे, एकीकडे पावसाचे आणि ढगफुटींचे प्रमाण वाढत आहे आणि दुसरीकडे सर्व प्रकारच्या अतिक्रमणांमुळे नदीपात्र अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्रसले जात आहे. अगदी तुलनाच करायची झाली तर ह्या परिस्थितीची तुलना हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्‍तवाहिनीशी करता येईल.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जसं त्या रक्तवाहिनीत कोलेस्टेरॉल जमा होऊन हृदयाचा रक्तपुरवठा कमी करत असतं, अगदी तशीच नदी पात्रातील अतिक्रमणांनी नदीची वहनक्षमता कमी केली आहे. जणूकाही आता आपण हृदयविकाराच्या झटक्याचीच वाट पाहत आहोत. दुर्देवाने आजच्या या भीषण परिस्थितीला स्थानिक राजकारणी आणि प्रशासन जबाबदार आहे आणि याचे भयानक परिणाम मात्र निष्पाप सामान्य जनतेला भोगावे लागणार आहेत.

River Plogathon : ‘रिव्हर प्लोगेथॉन’ मोहिमेत 3 टन कचरा संकलित

खडकवासला धरणाची विसर्गक्षमता एक लाख क्युसेक्स आहे. हा विसर्ग खडकवासला धरणापासून काही मिनिटांमध्ये पुण्यात येऊ शकतो. या दरम्यान धरणाच्या खालच्या बाजूला सुध्दा जर पाऊस पडत असेल तर ह्या विसर्गात अजून किमान 50 हजार क्युसेक्स छोट्या मोठ्या ओढ्यांमधून येऊन मिळतात. म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि पुण्याच्या आसपास जर जोरदार पाऊस कोसळू लागला तर फक्त मुठा नदीतून दीड लाख क्युसेक्सचा लोंढा पुणे शहरावर आदळू शकतो.

…तर महाप्रलयाचा धोका!

आजच्या परिस्थितीत 60 हजार क्युसेक्सच्या प्रवाहाला निश्चित केलेली पूररेषा जर 45,474 क्युसेक्सच्या प्रवाहाने ओलांडली जात असेल तर दीड लाख क्युसेक्सचा लोंढा मुठेतून आला तर पुण्यात केवढा मोठा प्रलय होईल याची कल्पनाही करवत नाही. आणि हे कधीही होऊ शकते. दुर्दैवाने प्रशासनाला आणि राजकारण्यांना याची काहीही जाणीव नसावी असे दिसते.

सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (CWPRS) या पुणे स्थित संस्थेने मुठा नदीतील मेटोच्या बांधकामामुळे नदीच्या पूरपातळीत काय फरक पडणार आहे यावर एक अहवाल नुकताच सादर केला. त्या अहवालात असा धक्कादायक खुलासा केला आहे की, मुठा नदीत 60 हजार क्युसेक्सचा प्रवाह निळ्या पूररेषेच्या पातळीला वाहणे अपेक्षित होते परंतु प्रत्यक्षात हा प्रवाह आता निळ्या पूररेषेच्याही पाच फूट वरून वाहील.

राजकारणी आणि प्रशासन अजूनही मूग गिळून गप्प का?

थोडक्यात, अतिक्रमणांमुळे पुण्यातील पूरपातळी मुळातच पाच फुटांनी वर गेलेली आहे. पूर पातळीच पाच फुटांनी वर जाणे ही अतिशय गंभीर नव्हे तर भयानक वस्तुस्थिती आहे. नदीच्या पाण्याची पातळीच जर पाच फूट वर गेली तर ते पाणी पूर परिस्थितीत दोन्ही काठांच्या पलीकडे काही शे फूट अजून पसरेल. हजारो घरे या पाण्याने वेढली जातील. प्रश्न हा आहे की जानेवारी 2021 मध्ये हा अहवाल CWPRS ने सादर करूनही आपले राजकारणी आणि प्रशासन अजूनही मूग गिळून गप्प का?

Pune River
नदीपात्रातील हिरव्यागार पाणथळ जागा

या परिस्थितीला अजून एक परिमाण आहे ते म्हणजे मुळा आणि मुठेचा संगम. मुठा नदीतून जसा दीड लाख क्युसेक्स प्रवाह येऊ शकतो तसाच मुळा नदीतूनही एक लाख 60 हजार क्युसेक्सचा प्रवाह येऊ शकतो. या नद्या संगमवाडीपाशी एकमेकींना काटकोनात मिळतात आणि त्यामुळे संगमापाशी परस्परांच्या प्रवाहाचा वेग कमी करतात. त्यामुळे अर्थातच पूरपरिस्थितीमध्ये दोन्ही नद्यांमध्ये पाण्याचा फुगवटा निर्माण होतो आणि परिस्थिती अजून गंभीर बनू शकते.

पुण्यातील नद्यांमधील जैवविविधता

पुण्यातील नद्यांमधील जैवविविधता हा एक मोठा आणि स्वतंत्र विषय आहे. आत्ता तरी एवढंच म्हणता येईल की, नद्यांमधील प्रदूषणामुळे आणि नदीपात्रातील अतिक्रमणांमुळे या जैवविविधतेचा अपरिमित विध्वंस झालेला आहे. असंख्य झाडे तोडली गेली आहेत. नदीकडेचा पाणथळ भूभाग, जी एक संपन्न जीवसृष्टीच असते, तो मोठ्या प्रमाणावर बुजवला गेला आहे.

या पाणथळ भागात अनेक वनस्पती, असंख्य प्रकारचे कीटक आणि सरपटणारे प्राणी असतात आणि त्यामुळे तेथे अनेक पक्ष्यांचा कायम संचार असतो. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. अनेक ठिकाणी या पाणथळ जागा अजूनही तग धरून आहेत. आपली जबाबदारी आहे की, अस्तित्वात असलेल्या पाणथळ जागांचे संरक्षण करणे आणि बुजवल्या गेलेल्या जागा मोकळ्या करणे.

पावसाळ्याचे दिवस सोडले तर नदीतून वर्षभर फक्त अत्यंत प्रदूषित सांडपाणीच वाहत असतं. प्राणवायूची कमतरता या पाण्यामध्ये असल्याने दुर्देवाने आता नदीत 1-2 प्रकारचेच मासे शिल्लक आहेत. खरंतर आपणच याला जबाबदार आहोत. जर आपण प्रदूषित पाणी नदीत सोडणे बंद केले तर अजूनही वेगवेगळे मासे आणि इतर जलचर नदीत येऊ शकतात. या माश्यांच्या अस्तित्वावर अनेक कोळी बांधवांचे संसार अवलंबून आहेत.

Pune River

प्रदूषणामुळे भूजल सुद्धा विषारी

सांडपाण्यामुळे नदीचे पाणी इतके प्रदूषित झाले आहे की त्यामुळे आता भूजल सुध्दा अत्यंत विषारी झाले आहे. विहिरींमधल्या पाण्याची प्रत खालावली आहे. हे फक्त पुण्याच्या आसपासच आहे असे नाही तर पुण्यात पासून काही शे किलोमीटर पर्यंतचे भूजल आणि पर्यायाने विहिरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषणामुळे खराब झाल्या आहेत. यामुळे त्या भागातील शेतीवर विपरित परिणाम झाले आहेत. प्राण्यांमध्ये आणि नागरिकांमध्येही काही विशिष्ठ आजारही बळावले आहेत. या परिस्थितीला आपले प्रशासन, आपण निवडून दिलेले नगरसेवक म्हणजे पर्यायाने आपणच जबाबदार नाही का?

या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून जाणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प काय आहे? कसा आहे? त्याचे परिणाम काय होतील? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे शोधणे ही केवळ परिस्थितीची गरज नाही तर आपली जबाबदारीच आहे.

(काय आहे पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प? – वाचा पुढील भागात)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.