Pune : रोहित पवारांचा ससूनमधील कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, रुग्णांशी संवाद

Rohit Pawar interacts with doctors and patients fighting corona in Sassoon

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पुणे आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.27 ) राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ससून हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, रुग्णांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.

आमदार रोहित पवार यांना अतिदक्षता विभागात जाण्याबाबत विचारणा करण्यात आली, त्यावेळी ते न घाबरता आवर्जुन त्या ठिकाणी जाऊन जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची व कोरोनाशी लढा देत असताना संक्रमित झालेल्या डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक आदींची भेट घेतली. त्यांना ‘काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला.

यावेळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या अडचणी व तेथील परिस्थितीही जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याबरोबरच पुणे येथील हॉस्पिटलवरही बारकाईने लक्ष आहे. कोरोना वॉरीयर्सना लागणारी मदतही ते पोहोचवत आहेत, असे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मानदेशी फाऊंडेशनच्या वतीने ससून हॉस्पिटलसाठी पीपीई किट, गॉगल व एन-९५ मास्क रोहित पवार यांच्याकडे देण्यात आले होते. हे सर्व साहित्य पवार यांनी ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोनाशी लढणाऱ्या सर्वच डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांचे रोहित पवार यांनी विशेष आभार मानले. अनेक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. अनेक रुग्ण सध्या कोरोनावर यशस्वी मातही करत आहेत.

कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असताना आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाशी लढा देणाऱ्या कोरोना वॉरीयर्सना संरक्षित करण्यासाठी आमदार रोहित पवारांनी मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील रुग्णालयांना सॅनीटायझर पुरवले. कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता आणखी काय उपाय योजना करता येतील का? याबाबत पवार हे प्रयत्नशील आहेत.

यावेळी डॉ. योगेश गवळी, डॉ. हरीश ताटीया, डॉ. मुरलीधर बिरादार, डॉक्टर, नर्स व कर्मचारी उपस्थित होते.

मतदारसंघातील ‘त्या’ रुग्णाचीही घेतली भेट

रोहित पवारांनी ससून हॉस्पिटलमधील रुग्ण, डॉक्टर, नर्स आदींना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातील रुग्ण देखील याच हॉस्पिटलमध्ये असल्याचे पवार यांना समजताच त्यांनी त्या रुग्णाचीही आवर्जून भेट घेतली. कोरोनाला हरवून लढाई जिंकायची आहे, असे म्हणत प्रोत्साहित केले.

त्यांच्या भेटीचाही ‘शब्द’ पाळला

मागील काही दिवसांपुर्वी पवार यांनी नायडू रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. तसेच त्यांना प्रोत्साहित केले होते. तेथील डॉक्टर, नर्स आदींनी रुग्णालयात येवून जा, असा आग्रह धरला होता. पवारांनी त्या ठिकाणी जाऊन सर्वांची भेट घेऊन सर्वांचे आभार मानले आणि दिलेला शब्द पाळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.