Pune : डॉ. आंबेडकर जयंती कुटुंबीयांसह घरीच साजरी करावी; ‘रिपाइं’चे जनतेला आवाहन

एमपीसी न्यूज – जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. पुण्यासह राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गर्दी करून कोरोनाला पोषक वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबियांसह घरच्याघरी साजरी करत अभिवादन करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने  जनतेला करण्यात आले आहे.

‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी पत्रक काढून राज्यभरातील आंबेडकरी कार्यकर्ते व समाजाला जयंतीनिमित्त गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. विविध पक्षाचे कार्यकर्ते, सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना यांनी पुतळ्यावर जमा होऊ नये, मिरवणुका काढू नयेत, रस्त्यावर येऊन गर्दी होईल, असे कोणतेही कार्यक्रम करू नयेत, असे या पत्रकात म्हटले आहे. कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे कमी झाल्यानंतर जयंती साजरी करावी, असेही यात म्हटले आहे.

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, शहर युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, सरचिटणीस बाबूराव घाडगे, माहिपाल वाघमारे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे, फरझाना शेख, मोहन जगताप, रफिक दफेकर, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, शाम सदाफुले आदींनीही जयंती घरी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

बाळासाहेब जानराव म्हणाले, कोरोनामुळे देशभरात भीतीचे वातावरण आहे. त्यातही महाराष्ट्रात आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. राज्य सरकार आणि प्रशासन ही साथ आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेत आहे. अशावेळी गर्दी करून कोरोनाच्या नियंत्रणात आडकाठी होणार नाही, यासाठी ‘रिपाइं’ कायमच प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी तबलिगी समाजाच्या मरकजमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, तशी परस्थिती आंबेडकर जयंतीमुळे उद्भवू नये, या उद्देशाने जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी, विविध संस्था व संघटनानी शहरातील विविध ठिकाणच्या आंबेडकर पुतळ्याजवळ जमा होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.