Pune: पथारी व्यावसायिकांच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचे महापालिका आयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील परवानाधारक पथारी व्यावसायिकांवर महानगरपालिकेकडून सतत होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेण्यात आली.

पुणे महानगरपालिका अधिकारी, आयुक्त व पुणे पोलिस आयुक्त यांच्या सयुक्त बैठकीमध्ये वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरातील बारा रस्त्यांवर ‘नो हॉकर्स झोन’ करण्याचे धोरण ठरले आहे. परंतु, या रस्त्यांवर अधिकृत ‘अ ब क’ परवानाधारक यांचे पुनर्वसन न करता कारवाई होत आहे. गेली दोन महिन्यांपासून कसल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता पुणे महानगरपालिकाच्या वतीने कारवाई होत आहे. त्यामुळे शहरातील हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्वांचा आवाज महापालिका आयुक्तांपर्यंत पोचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी भेट घेतली. आधी पुनर्वसन व नंतर कारवाई, अशी भूमिका घेतली.

_MPC_DIR_MPU_II

मुख्य रस्त्यावर न बसता, अडथळा न ठरणाऱ्या जोड रस्त्यावर बसणाऱ्या पथारी व्यवसायिकांवर सतत कारवाई होत आहे व कारवाईच्या पोटी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे, अशा वेळी या गरीब व्यावसायिकांनी काय करावे, त्यांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे, अशा शब्दांत डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी आयुक्तांना विचारणा केली.

यावर आयुक्त शेखर गायकवाड यांनी उपायुक्त महादेव जगताप यांना सूचना दिल्या की, पथारी व्यवसायिकांना देखील जगण्याचा अधिकार आहे. प्रमुख रस्ता सोडून अंतर्गत रस्त्यांवरील फुटपाथवर पथारी व्यवसाय करण्याचे व सर्व शहानिशा करून कारवाई करा, पुनर्वसनाची जागा निश्चित करा, असे निर्देश देण्यात आले.

याप्रसंगी डॉ. सिध्दार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, शाम सदाफुले, जितू गायकवाड, शांतीनाथ चव्हाण, शशिकांत पंडित पथारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.