Pune : चिनी मालावर बहिष्कार घालण्याची ‘आरपीआय’ची मागणी

RPI demands boycott of Chinese goods

एमपीसी न्यूज – चीनने भारतीय गलवान खोऱ्यातील भूभाग बळकवण्याच्या दृष्टीने कटकारस्थान करून नियोजितपणे भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये २० निशस्त्र भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या (आरपीआय) वतीने जाहीर निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चीनी मालावर बहिष्कार घालून चीनची आर्थिक कोंडी करण्याची मागणी करणारे निवेदन ‘आरपीआय’ने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम याना दिले.

यावेळी ‘आरपीआय’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रातिनिधिक आंदोलन करण्यात आले. ‘आरपीआय’चे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, ‘आरपीआय’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव बाबुराव गायकवाड, मोहन जगताप, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.

भारतीय सैन्यदल भूभागाच्या रक्षणासाठी सज्ज व सक्षम आहे, हे दाखवून देण्यासह चीनची आर्थिक कोंडी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चीनमधून कोणत्याही वस्तू, साधन सामग्री आयात करू नये.

सर्व प्रकारच्या चिनी मालावर बहिष्कार घालून टिकटॉक व अन्य चिनी मोबाईल अप्लिकेशनवरही बंदी घालावी, असे ‘आरपीआय’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स कंपनीशी पुण्यातील तळेगाव येथे स्पोर्ट्स कार बनविण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे. हा करार तातडीने रद्द करून चीनला हद्दपार करावे, अशीही मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.