Pune : लॉकडाऊनला आरपीआयचा विरोध 

RPI opposes lockdown

एमपीसी न्यूज – सोमवारी मध्यरात्री (दि. 13 जुलै) पासून घोषित केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर चा विरोध असल्याचे म्हटले आहे.

त्यासंबंधीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे अंमलदार कोरोगाव पार्क पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष अशोक शिरोळे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, शैलेश चव्हाण, मोहन जगताप, बसवराज गायकवाड उपस्थित होते.

COVID-19 या महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. 9 मार्चला पहिला रुग्ण भारतात आढळला. त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून देशात आणि सर्व राज्यांमध्ये 22 मार्चपासून लॉकडाऊन घोषित केला, जो आजतागायत सुरू आहे. राज्याने घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे  आर्थिक दुर्बल घटकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

आजही पुणे शहरातील दाट वस्तीतील परिसर, कॅन्टोन्मेंट झोन घोषित असल्याने पूर्वपदावर आलेले नाही. त्यामध्ये घरकाम करणारी महिला, रिक्षा व्यवसाय करणारे, हातावर पोट असलेले कामगार यांना कोरोनाची भीती नसून विना अन्नपाण्याने मारण्याची भीती निर्माण झाली आहे. घरेलू कामगार, चतुर्थश्रेणी कामगार वर्ग, पुणे शहरातील सेवा पुरविणारा कामगार, अंगमेहनती कष्टकरी, बांधकाम कामगार आणि हातावर पोट असणारे सर्व पथारी व्यावसायिक यांची गेल्या 4 महिन्यांत आर्थिक उत्पन्न शून्य आहे. त्यामुळे हे सर्वजण मरणयातना सहन करीत आहेत.

गेल्या महिन्याभरापासून थोडा फार दिलासा शासनाने दिला होता. तोही या लॉकडाऊनमुळे शून्य होणार आहे. सर्व गरीब घटकांच्या घरांमध्ये पुढील महिनाभर पुरेल एवढे आर्थिक नियोजन शासनाने आधी करावे. त्यानंतर लॉकडाऊन घोषित करावे, असे आरपीआयतर्फे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.