Pune : नाराज आरपीआय नेत्यांची खासदार काकडे यांनी काढली समजूत

एमपीसी न्यूज – महापौर-उपमहापौर पदासाठी आरपीआय (आठवले गट) ला डावलण्यात आल्यामुळे आरपीआयचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या पदाधिकायांची राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी समजूत घातली. यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे केवळ एक वर्षासाठी असल्याचे यावेळी त्यांना सांगण्यात आले. मात्र, आरपीआय हे मानायला तयार नाही. समजूत घालताना आरपीआय आणि भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. मात्र त्यानंतर नाराज आरपीआय नेत्यांची समजूत काढण्यात खासदार काकडे आणि आमदार माधुरी मिसाळ यांना यश आले.

यावेळी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, ” मोहोळ आणि शेंडगे यांना संधी देण्यात आली असून एकमताने या दोघांनाही पाठिंबा मिळेल. आरपीआयची नाराजी दूर केली आहे. त्यांच्या पाचही नगरसेवकांना सत्तेचा लाभ मिळाला. आता त्यांच्याशी चर्चा करूनया पुढेही सत्तेचा लाभ देऊ ” असे मिसाळ म्हणाल्या.

कोथरूड विधानसभा निवडणुकीत तीव्र इच्छुक असलेल्या नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची देखील खासदार संजय काकडे यांनी नाराजी दूर केली काकडे म्हणाले, ” महापौरपद हे आमदारपदापेक्षा मोठे पद असून मोहोळ यांची देखील नाराजी दूर केली आहे. लवकरच फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत ” असा विश्वास खासदार काकडे यांनी व्यक्त केला.

आपल्या निवडीबद्दलप्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, ” अनेक लोक पदासाठी पात्र असतात. मात्र, सर्वच वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिली याचा आनंद आहे”

पुढील वर्षी आम्हाला उपमहापौर पद मिळणार-  डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर

आरपीआय (आठवले गट) इमानेइतबारे भाजप बरोबर काम करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. पुढील वर्षी आम्हाला उपमहापौरपद मिळणार असल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. इतर कमिटीतही आम्हाला समान स्थान मिळणार आहे. आमचे पाच नगरसेवक असून आम्ही सध्या भाजप बरोबर आहोत, असेही धेंडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like