Pune: सिमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातील 11 लाख रुपये लंपास
Pune: Rs 11 lakh looted from bank account under the pretext of updating SIM card पुण्याचा लष्कर भागातील 57 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.
एमपीसी न्यूज- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये असाच ऑनलाइन संबंधित एक गुन्हा उघडकीस आला. यामध्ये एका व्यक्तीला सिमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फोन करून त्याच्या बँकेतील 11 लाख रुपये सायबर चोरट्याने लंपास केले. पुण्याचा लष्कर भागातील 57 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. 25 ते 27 मे या कालावधीत घडला. लष्कर परिसरात राहणाऱ्या या व्यक्तीच्या मोबाईलवर दोन महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. एका नामांकित मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्याचा विश्वासही संपादन केला. तसेच सिमकार्ड अपडेट करणे गरजेचे असल्याचे सांगून त्याच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला.
काही वेळाने या सायबर चोरट्याने या व्यक्तीला परत फोन करून मोबाईलवर आलेला मेसेज 12345 या क्रमांकावर पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने हा मेसेज पाठवल्यानंतर काही वेळातच त्याच्या मोबाईलमधील बँक खात्यातून गोपनीय माहिती चोरली आणि त्याच्या खात्यातील 11 लाख 17 हजार रुपये इतरत्र ट्रान्सफर केले.
दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित करीत आहेत.