Pune : विजय शिवतारे यांच्या सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेला रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज – शिवसेना आमदार, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कर्तृत्व काय, त्या खासदार म्हणून अपयशी ठरल्या असल्याची टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाच्या माहितीचे पत्र शिवतारे यांना पाठविले आहे.

सायकल, श्रवणयंत्र, चप्पल वाटणे अशी कामे मंडळाचे पदाधिकारी देखील करतात. एखाद्या खासदाराचे हे काम नक्कीच नाही. बारामती मतदार संघातून खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्या आहेत, अशी टीका शिवतारे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना चाकणकर यांनी फेसबुकवर शिवतारे यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यानंतर शिवतारे यांचे कार्यकर्ते चाकणकर यांना सुळे यांनी काय काम केले याबाबत विचारणा करत होते. त्यामुळे चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाच्या माहितीचे पत्रच शिवतारे यांना पाठविले आहे.

रुपाली चाकणकर पत्रात म्हणतात, आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या 200 कुटुंबांना सुप्रियाताई यांनी दत्तक घेतले होते. तेव्हा तुम्हाला दिसले नसेल कदाचित, कानातील मशीन वाटण्याचा हा मोठा कार्यक्रम सुप्रियाताईंनी मतदारसंघात घेतला ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. तेही तुम्हाला कदाचित माहित नसेल. कारण ज्यांना ऐकू येत नाही किंवा ऐकू कमी येत होते त्यांना त्याची किंमत कळू शकते. सासवड येथे 9000 अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले होते. तेव्हा तुम्हीही त्या ठिकाणी उपस्थित होता. कदाचित तुम्हाला विस्मरणाचा त्रास असावा. त्यामुळे तुम्हाला तेही आठवत नसेल. 150 लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. तीही मोफत त्याची किंमत तुम्हाला कळणार नाही.

विजयबापू, कारण तुम्ही तशी मदत कोणालाही केली नसेल किंवा त्या कुटुंबाची काय परिस्थिती असू शकते हे तुम्हाला जाणवली नसेल. सुप्रियाताई यांच्या माध्यमातून कात्रज येथे सहा पदरी पुलासाठी 223 कोटी मंजूर झालेत. त्याची माहिती आपण घ्‍यावी. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येताना अनेक अडचणी होत्या. त्यांची अडचण दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून 25,000 सायकली मतदारसंघात वाटण्यात आल्या आहेत. कदाचित तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही पण त्या मुलींना नक्कीच कळेल ज्या दोन दोन किलोमीटर चालत शाळेत येत होत्या.

राष्ट्रीय पेयजल योजनेतून 200 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. त्याचीही माहिती तुम्ही घ्या. 14 कोटी 70 लाख रुपये फक्त रेल्वेसाठी तुमच्या तालुक्‍यात मंजूर झाले आहेत. याची माहिती तुम्ही घेतली तर बरं होईल. असो. लिस्ट मोठी आहे तुम्ही त्याची माहिती घ्यावी. सोबत मी काही फोटो पाठवले आहेत ते पाहावे म्हणजे तुम्हाला थोडेफार लक्षात येईल आणि तुमचे डोळे उघडतील ही अपेक्षा.

आता थोडं तुमच्या कामांकडे वळूयात तुम्ही महाराष्ट्राचे जलसंपदा राज्यमंत्री आहात. महाराष्ट्रात तुम्ही मंजूर केले दोन चार प्रकल्प तुम्हाला सांगता येतील का ? गुंजवणीचे पाणी एका सहीवर आलं आहे असे तुम्ही मागच्या पाच वर्षापूर्वी बोलत होतात. 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाच टक्के राहिले आहे असेही तुम्ही बोलत होतात त्याचं काय झालं ? दहा वर्षात तुम्हाला पाच टक्के कामही पूर्ण करता आले नाही का, याचे उत्तर आम्हीच नव्हे तर पूर्ण पुरंदरची जनता मागत आहे त्याबद्दल तुम्ही थोडे बोलाल का ?, तुमच्या तालुक्यात भीषण दुष्काळ आहे लोकांना प्यायला पाणी नाही. त्यांनी जनावरे विकून टाकली आहेत एक मंत्री म्हणून तुम्ही पुरंदरचा दुष्काळ मिटवण्यासाठी काय प्रयत्न केले ? पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काय प्रयत्न केले ? याचे उत्तर आम्हाला हवे आहे.

पुरंदरमध्ये रोजगाराची गरज असताना तुम्ही कारखाना नगरमध्ये का काढला ? याचे लोकांना उत्तर सापडत नाहीये. तुम्ही पहिल्यांदा आमदार होणार होता. त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की पुरंदरमध्ये आम्ही कॉलेज काढणार ते कॉलेज कुठे आहे आणि कुठे काढले आहे ? याची माहिती तुम्ही दिली तर बरं होइल. तुम्ही एमआयडीसी आणणार होता आणि लाखो तरुणांना रोजगार देणार होता. त्याचं काय झालं? असे अनेक प्रश्न पुरंदरमध्ये आहे ज्याचे उत्तर तुम्ही द्यावे हे आम्हाला अपेक्षा आहे.

स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी केवळ पवार साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणे तुम्हाला शोभत नाही आणि सुप्रियाताई सुळे यांनी पवार साहेबांचे नाव वापरून कधीही राजकारण केले नाही. जर तसं असेल तर ते तुम्ही आम्हाला दाखवावे. ज्यांना स्वतःचे कर्तृत्व असते त्यांना दुसऱ्याचे नाव घेऊन राजकारण करण्याची गरज नसते. ज्याप्रमाणे तुम्हाला पवार साहेबांचे नाव घेऊन मते मिळवण्याची हौस आहे. शरद पवारांच्या नावाचा एवढा वापर तर सुप्रियाताई यांनीही केला नसेल. कदाचित तुमचे कर्तृत्व कमी पडत असेल. राजकारण कराच पण त्याचा उपयोग जनतेसाठी कसा होईल याचा विचार करा केवळ विरोधाला विरोध म्हणून सुप्रियाताईंबद्दल खालची भाषा वापरली तर आम्ही ते सहन करणार नाही, याची नोंद आपण घ्यावी ही विनंती, असे रुपाली चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.