Pune : मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी ठोकले हिरकणी कक्षाला टाळे

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिलावर्गासाठी त्यांच्या मुलासाठी मुख्य इमारतीमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे. मात्र, मागील काही दिवसापासुन त्या हिरकणी कक्षाचा ताबा अधिकारी वर्गाने घेतल्याच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेत मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी हिरकणी कक्षाला टाळे ठोकले.

यावेळी माजी नगरसेविका रूपाली पाटील म्हणाल्या की, महापालिकेत काम करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी हिरकणी कक्षा तयार करण्यात आला आहे. मात्र या हिरकणी कक्षाचा पालिकेच्या अधिकारी वर्गाने ताबा घेऊन त्याठिकाणी काम सुरु केले आहे. ज्या कामासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी याचा वापर झाला पाहिजे. अन्य कोणत्याही कामासाठी हा कक्ष वापरला जाऊ नये, अशी आमची मागणी आहे.

भविष्यात असा प्रकार घडल्यास आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. यावेळी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.