Pune Rural Crime News : घरफोड्या करणारी बंटी-बबली ‘एलसीबी’कडून जेरबंद

एमपीसीन्यूज : भाडे तत्वावर राहून घर मालकाचा विश्वास संपादन करीत घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या बंटी -बबलीच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आहे. या आरोपींकडून महाराष्ट्रातील एकूण दहा घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.

नवनीत मधुकर नाईक (वय 40), स्मिता नवनीत नाईक (वय 36, दोघेही रा. विजय निवास, रेडिस चाळ, शिवाजी नगर, भांडुप (पश्चिम) मुंबई), अशी अटक केलेल्या बंटी आणि बबलीची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ट पथक बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत होते. या गुन्ह्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण 3 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

या प्रकरणी मिळालेली गोपनीय माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी बारामती येथे  भाडे तत्वावर राहून घर मालकाचा विश्वास संपादन करून घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींची कसून चौकशी केली असता या जोडीने महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले.

बारामती तालुका पोलीस ठाण्यासह भोर, लोणावळा ग्रामिण, कोपरगाव, पोयनाड, शहापूर, मोरा सागरी, लोणंद, बडनेरा, पेठ वडगाव आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 10 गुन्हे केल्याचे या जोडीने पोलिसांना सांगितले.

या दोन्ही आरोपींवर सदर बाजार, छावणी पोलीस स्टेशन नाशिक, मिरज, वाशी, कोपरगाव, पोयनाड, दापोली, रबाळे, केआर पुरम ( बंगळुरु), कारंजा, इगतपुरी, मलूर (कोलार- कर्नाटक), गुहागर आणि रत्नागिरी शहर आदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक पोलीस फौजदार, दत्तात्रय गिरमकर, हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, पोलीस नाईक राजू मोमिन, विजय कांचन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे, कॉन्स्टेबल धीरज जाधव,  ज्योती बांबळे, दैवशिला डमरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.