Pune Rural Police News : वालचंदनगर पोलिसांकडून कोरोना रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

एमपीसीन्यूज : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कोरोना केअर सेंटर, कोविड सेंटर व ज्येष्ठ नागरिकांना वालचंदनगर पोलस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देवून रुग्णांना दिलासा व सर्वसामान्य नागरिकांना मानसिक आधार दिला.

इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाचे 1663 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. अनेक रुग्णांना बेड व रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोरोना केअर सेंटर, कोविड सेंटरला भेटी देवून सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांशी संवाद साधून रुग्णांना आधार दिला. तसेच हॉस्पिटलमध्ये असणारे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता यांची माहिती घेतली.

‘ऑक्सिजन’वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी लासुर्णेमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरणाची माहिती घेतली.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची चौकशी, काढा, व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वालचंदनगर,आनंदनगर व जंक्शन परिसरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले कामानिमित्त पुणे, मुंबई तसेच परदेशामध्ये आहेत. ज्येष्ठ नागरिक एकटेच घरी राहत असल्याने साहय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेवून त्यांच्या आरोग्याची चौकशी केली तसेच त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा काढा, व्हिटॅमिन गोळ्या, चवनप्राश, मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. तसेच गरज असल्याचे तातडीने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.