Pune : सागर खळदकरला पालिकेचा ‘क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ प्रदान

एमपीसी न्यूज- ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार विजेते कबड्डी प्रशिक्षक सागर खळदकर यांना पुणे महानगरपालिकेचा ‘कै. बाबुराव दगडू गायकवाड क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ देऊन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गौरविण्यात आले, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पत्रकाद्वारे दिली.

गेल्या ५ वर्षांपासून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’च्या वतीने ‘कोथरूड भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. शहरातील कोथरूड परिसरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून भविष्यात उभारी घेणाऱ्यांना मदत होते, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक राहुल म्हस्के यांनी दिली.

‘क्रीडा क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्याची दखल घेत ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार मिळाला. अपंगत्व येऊनही पाच शाळांमध्ये या पुरस्कारामुळे कबड्डी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. माझ्या या कामाची दखल घेऊन पालिकेचा हा सन्मान देखील मिळाला आहे. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चा, राहुल म्हस्के आणि गिरीश गुरनानी यांचा मी ऋणी आहे. समाजात काहीतरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या गुणवंत, कलावंताना ट्रस्ट पुरस्कार देते हे अभिमानास्पद कार्य आहे, ‘ अशी प्रतिक्रिया सागर खळदकर यांनी दिली.

सागर खळदकर या आंतरराष्ट्रीय व महाराष्ट्रस्तरीय कब्बडीपटूला काही कारणाने अपघात होऊन पॅरालिसिससारख्या आजाराने जखडले. परंतु खचून न जाता परीस्थितीवर मात करून आपल्यातील खेळाडूची कला इतरांना देण्याचे प्रशिक्षण सुरु केले. भारती विद्यापीठ मधील अभिजितदादा कदम कब्बडी संघाला प्रशिक्षण दिले. जिल्हा, राज्य,विद्यापीठ स्तारावर उत्तम कामगिरी करणारे खेळाडू घडवले. त्याच्या प्रशिक्षणामुळे काही खेळाडूंची आर्मी, पोलीस क्षेत्रात निवड झाली. आपले काम जिद्दीने पुढे नेऊन खेळाडू घडविण्याचे मोलाचे कार्य तो करीत आहे. या त्याच्या कामगिरीसाठी २०१८ मध्ये त्याला ‘कोथरूड भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.