Pune : संविधान टिकवण्याचा लढा प्राणपणाने लढला पाहिजे- श्रीरंजन आवटे

'सम्यक पुरस्कार समिती' संविधान परिषदेत संविधान रक्षक कार्यकर्त्यांचा गौरव

एमपीसी न्यूज- ‘संविधान हे भारतीय नागरिकाची ओळख, ओळखपत्र आणि आत्मा आहे. भारत नावाचे स्वप्न, कविता टिकून राहावी असे वाटत असेल तर लोकशाही, संविधान टिकवण्याचा लढा प्राणपणाने लढला पाहिजे’, असे प्रतिपादन युवा लेखक श्रीरंजन आवटे यांनी केले. ‘सम्यक पुरस्कार समिती’ तर्फे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आणि संविधान दिनानिमित्त मंगळवारी (दि.26) संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीरंजन आवटे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव साळवे तर अॅड. किरण कदम हे स्वागताध्यक्ष होते. अंकल (यादवराव) सोनवणे यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती निर्मला वंशू, आनंद वैराट, दीपक (आण्णा) गायकवाड, संतोष (आबा) सुरते, राजेंद्र चौधरी,अमोल (सोनू) काशिद,आनंद शिंदे, प्रा. वाघमारे उपस्थित होते .

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमात अॅड. शारदा वाडेकर, तुषार काकडे, शैलेंद्र चव्हाण, विकास सातारकर, संदीप बर्वे, डॉ. संजय सोनेकर, दत्ता जाधव, संजय आल्हाट, रोहिणी टेकाळे, प्रा.डॉ. दादाराव इंगळे या संविधानरक्षक सामाजिक कार्यकर्त्यांना सम्यक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

युवा लेखक श्रीरंजन आवटे, युवक क्रांती दलचे राज्य संघटक जांबूवंत मनोहर, दलित युवक आंदोलनचे संस्थापक सचिन बगाडे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. ‘सम्यक पुरस्कार समिती’चे संस्थापक नागेश भारत भोसले यांनी स्वागत केले.

श्रीरंजन आवटे म्हणाले, “मनुस्मृती हे कर्मठ संविधान जाळून नवं प्रागतिक संविधान डॉ.आंबेडकर यांनी भारताला दिले, ही जगातील मोठी गोष्ट आहे.
अघोषित आणीबाणीचा हा काळ आहे. तडीपार, दंगेखोर सत्तेत आहेत. गुन्हेगारांचे राजकारण चालू आहे. व्यक्त होताना भीती वाटत आहे. खरा नागरिक कोण हे प्रश्न विचारले जाणार आहेत, डिटेंशन कॅम्प बांधले जात आहेत. हिटलरची आठवण येणारा भयावह काळ आहे. अशा काळात संविधान हा आशेचा कंदील आहे. लोकशाही ही जीवनशैली आहे. रोजच्या जगण्याची गोष्ट आहे. संविधान हे भारतीय नागरिकाची ओळख, ओळखपत्र, आत्मा आहे. भारत नावाचे स्वप्न टिकून राहावे असे वाटत असेल तर लोकशाही टिकवण्याचा लढा प्राणपणाने लढला पाहिजे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.