Pune : पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने पुलवामा हल्ल्यातील १५ शहिदांच्या कुटुंबीयांना १ लाखांची आर्थिक मदत सुपूर्त

एमपीसी न्यूज – लढाई सीमेवरील असो अथवा सीमांतर्गत भागातील असो, यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे नुकसान हे मोठे असते. हेच लक्षात घेत पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने या जवानांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने नुकत्याच १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यातील १५ शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी रु. १ लाखांची आर्थिक मदत आज सुपूर्त करण्यात आली. टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. नीतू मांडके सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

पुणे सीआरपीएफचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) बिरेंद्र कुमार टोप्पो यांच्या हस्ते ही मदत शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका,पुणे सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट सचिन गायकवाड, असिस्टंट कमांडंट संतोष भोसले यांबरोबरच पुणे सीआरपीएफचे जवान हे देखील यावेळी उपस्थित होते.

पुलवामा हल्ल्यातील शहीद रोहितदास लांबा, गुरु एच, नारायण लाल गुर्जर, हेमराज मीना, रमेश यादव, संजय राजपूत, कौशल कुमार रावत, प्रदीप सिंग, श्याम बाबू, अजित कुमार आझाद, नितीन राठोड, भगीरथी सिंग, जयमल सिंग, पंकज कुमार त्रिपाठी, कुलविंदर सिंग या महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश व कर्नाटकातील जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करीत त्यांना रु. १ लाखांचे धनादेश सुपूर्त करण्यात आले.

यावेळी बोलताना बिरेंद्र कुमार टोप्पो म्हणाले की “सीआरपीएफच्या या १५ शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आज असोसिएशनने जी आर्थिक मदत देऊ केली आहे ती मदत ही केवळ त्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नाही तर सीआरपीएफमध्ये काम करणा-या आमच्या सर्व जवानांच्या कुटुंबीयांना केली आहे असे आम्ही मानतो. या मदतीमुळे आम्हा सर्व जवानांच्या मनात एक आंतरिक समाधानाची भावना निर्माण झाली आहे. युद्ध सीमेवरील असो अथवा देशाच्या आंतरिक भागातील त्याची सर्वांत मोठी किंमत ही शहिदांच्या कुटुंबीयांना द्यावी लागते. त्यामुळे आम्ही लढत असताना शहीद झालो तर आमच्या मागे आमच्या कुटुंबीयांना मदत करायला आपल्या देशातील नागरिक नक्की उभे राहतील हा विश्वास आम्हाला आला आहे. आम्ही करीत असलेल्या बलिदानाची किंमत नागरिकांना आहे, याचे आम्हाला समाधान आहे.”

सीआरपीएफचे काम हे तीनही सैन्य दलाच्या तोडीसतोड तर आहेच याबरोबरच देशात अंतर्गत भागात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी देखील आम्ही कार्यरत असतो. आज देशाची अंतर्गत सुरक्षा ही देखील तितकीच महत्त्वाची असून गणपती असो, रथयात्रा असो, नक्षली हल्ला असो वा कोणतीही निवडणूक आम्हाला नेहमीच सज्ज असावे लागते. त्यामुळे आमची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. सरकारने आमच्यावर दिलेली ही जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न आमचा प्रत्येक जवान करीत असतो, असेही यावेळी टोप्पो यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.