Pune : पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे – श्रीनिवास पाटील

शाश्वत जीवनशैली विषयावरील 'वनराई' वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. नववर्ष सुरु होताना पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा संकल्प मांडणाऱ्या ‘शाश्वत जीवनशैली ‘ विषयावरील वनराई वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, “वृक्षराजी कमी होत असल्याने पर्यावरण आणि मानवी जीवन धोक्यात आले आहे. प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजेत आणि वाढवले पाहिजेत. अंत्यसंस्काराला लाकडे लागतात, म्हणून जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत. देवराया वाचवल्या पाहिजेत. रोजच्या कामात कागदाचा वापर कमी केला तरी पर्यावरणाचे रक्षण प्रत्येकाला करता येईल. मी स्वतः कागदाचा कमीत कमी वापर करतो. जमेल तसा पुनर्वापरही करतो असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले” पुणेकरांनी पाणी काटकसरीने आणि काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.वृक्षसंपदा वाढविण्याचे प्रयत्न वनराई ‘ ने प्रारंभीपासून केले आहेत. ते कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, “पुण्यात 25 इलेक्ट्रॉनिक बस 26 जानेवारीला कार्यान्वित होत आहेत. अशा 300 बसचे उद्दीष्ट आहे. पुण्याच्या पर्यावरणासाठी सायकलींचा वापर वाढविणे आवश्यक आहे. जुन्या जीवनशैलीतील पर्यावरणपूरक सवयी पुन्हा अंगीकारल्या पाहिजेत” लिफ्ट ऐवजी जिन्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून ‘नववर्षाचा पर्यावरणस्नेही संकल्प’ मांडला. तसेच पर्यावरण विषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कारही श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. एम. एस. स्वामिनाथन ,डॉ. माधव गाडगीळ ,डॉ. हेमा साने ,डॉ. भूषण पटवर्धन,गीता अय्यंगार इत्यादी मान्यवरांचे लेख या वार्षिक विशेषांकात आहेत . ‘वनराई’ चे अध्यक्ष रवींद्र धारिया हे वनराई मासिकाचे संपादक असून अमित वाडेकर हे कार्यकारी संपादक आहेत.

रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविकात वनराईच्या कार्याची आणि ‘शाश्वत जीवनशैली ‘ या विशेषांकाची माहिती दिली. शाश्वत विकास हेच वनराईच्या कामाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. जवळच्या अंतरासाठी दुचाकीऐवजी सायकल चालविण्याचा संकल्पही त्यांनी आपल्या भाषणात सांगितला

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “पुणेकरांना ठाम मत असते. त्यांनी शाश्वत जीवनशैलीसाठी पर्यावरणपूरक सवयीसाठी ठाम मत केले पाहिजे”. उल्हास पवार यांनी आपल्या भाषणात विशेषांकाचे व वनराईच्या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यकारी संपादक अमित वाडेकर यांनी ‘ शाश्वत जीवनशैली ‘ अंक प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. वनराई ‘ चे विश्वस्त रोहिदास मोरे यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.