Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 60 हजार एन.एस.एस. स्वयंसेवक ‘कोरोना’संचारबंदीत नागरिकांच्या मदतीला

पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत यंत्रणांना मदत, नागरिकांना आधार देणार

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीमुळे संपूर्ण संचारबंदी व बहुतांश व्यवहार बंद असल्याने सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. हा कमी करण्यासाठी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आणि नागरिकांना विविध गोष्टींसाठी मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) तिन्ही जिल्ह्यांमधील (पुणे, नाशिक व अहमदनगर) ६० हजार विद्यार्थी कार्यरत होणार आहेत. या संदर्भात कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी संबंधित अधिकारी आणि सदस्यांशी चर्चा करून याबाबतच्या सूचना आज दिल्या आहेत.

राज्यात संचारबंदीमुळे यंत्रणांना विविध कामे करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. तसेच, विशेषत: ज्येष्ठ नागरिक व अनेत कुटुंबांना विविध प्रकारच्या गोष्टींसाठी मदतीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ६० हजार विद्यार्थी मदतीला उभे राहणार आहेत. हे विद्यार्थी विविध गोष्टींसाठी यंत्रणांना मदत करण्यात आहेत. एन.एस.एस.चे ६०० कार्यक्रम अधिकारीही त्यात सहभागी होणार आहेत. त्यात पुढील बाबींचा समावेश आहे –

1. यंत्रणांकडून विविध घटकांसाठी (उदा. ज्येष्ठ नागरिक, मजूर, वगैरे.) जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. या वितरणव्यवस्थेत यंत्रणांना मदत करणे. त्यात महत्वाची भूमिका बजावणे.
2. शासनाकडून विविध वंचित घटकांसाठी बँकांमार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यासाठी बँकांमध्ये त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची मदत करणे.
3. जे वंचित घटक या लाभांच्या योजनांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे लाभ त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मदत करणे.
4. पोलीस मित्र म्हणून काम करणे. पोलिसांच्या गरजेनुसार पोलीस ठाण्यांमध्ये किंवा त्यांच्या मदत केंद्रात सहकार्य करणे. त्यांना आवश्यक असेल ती मदत करणे व महसूल यंत्रणेसोबत जोडले जाणे.
5. या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदानासाठीच्या फिरत्या व्हॅन चालवणे. त्यासाठी यंत्रणांना मदत करणे.

सॅनिटायझर व मास्क निर्मिती
याशिवाय विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबाबतचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडून पुरवले जाणार आहे. त्यावरून विद्यार्थी ही उत्पादने तयार करतील. सध्या आरोग्यसेवकांना या गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे, भविष्यात त्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ही उत्पादने तयार करून आरोग्य सेवकांना पुरविण्याची जबाबदारीसुद्धा हे विद्यार्थी घेणार आहेत.

सहा लाख कुटुंबापर्यंत पोहोचणार
एन.एस.एस.चे हे ६० हजार विद्यार्थी प्रत्येकी दहा गरजू कुटुंबांशी जोडले जाणार आहेत. त्याद्वारे तब्बल ६ लाख कुटुंब आणि तब्बल २५ लाख लोकांपर्यंत हे विद्यार्थी जोडले जाणार आहेत. त्या माध्यमातून या वंचित घटकांच्या गरजा व आरोग्याच्या समस्या, आदी गोष्टी थेट संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत. यातून या संचारबंदीच्या काळात घटकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होऊ शकेल.

या संदर्भात कुलगुरू प्रा. करमळकर यांनी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद यांचे काही सदस्य तसेच, एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी अशा तब्बल १०० जणांशी आज सायंकाळी ५ वाजता दूरसंवाद (टेलि-कॉन्फरन्सिंग) साधला. त्यातून आलेल्या सूचनांनुसार हा ठोस कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य व देश इतक्या मोठ्या आपत्तीशी लढत असताना विद्यापीठाने समाजात जाऊन थेट मदत करणे अपेक्षित आहे. याबाबत विद्यापीठाशी संबंधित सर्व अधिकारी, पदाधिकारी यांच्या सकारात्मक भावना आहेत. त्यामुळे हा ठोस कार्यक्रम घेऊन आम्ही समाजात जात आहोत. हा आमचा वाटा यंत्रणांवरचा ताण काही प्रमाणात कमी करण्याचा आणि समाजाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.