रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ कथक नृत्यकार पं. बिरजू महाराज यांच्या लालित्यपूर्ण नृत्याभिनयाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या सुश्राव्य गायनाने महोत्सवाची सांगता झाली.

पं. बिरजू महाराज यांनी राजदरबारात सादर केला जाणारा कथक नृत्यातील ‘बैठक का भाव’ सादर केला. ‘मोहे छेडो ना’, ‘तूच कर्ता आणि करविता’ या रचना त्यांनी ऐकवल्या तसेच ‘जाने दे मैंका सुनो सजनवा’ या रचनेवर अभिनय सादर केला. बिरजू महाराज यांच्या ज्येष्ठ शिष्या शाश्वती सेन आणि बिरजू महाराज यांच्या नात रागिणी महाराज यांनी या वेळी बिरजू महाराजांनी रचलेल्या काही नृत्यरचना सादर केल्या तसेच कथक नृत्यातील विविध तालबद्ध रचना त्यांनी उलगडून दाखवल्या. त्यांना अनिर्बान भट्टाचार्य (हार्मोनियम व गायनसाथ), गायत्री जोशी (सतार), विश्वजीत पाल (तबला), अझरुद्दीन शेख (बासरी) यांनी साथसंगत केली. या वेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते पं. बिरजू महाराज यांचा विशेष स्मृतीचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.

त्यांच्या आधी पं. देबू चौधरी यांचे पुत्र व शिष्य प्रतीक चौधरी यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग ‘मारवा’ आपल्या शैलीत सादर केला. त्यांनी सतारीवर सादर केलेल्या ‘हनुमंत ताल’ या सव्वापाच मात्रांच्या तालासही रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यांना उस्ताद रफीउद्दीन साबरी (तबला) आणि वैशाली कुबेर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने या पाच दिवसांच्या संगीतोत्सवाची सांगता झाली. त्यांनी राग ‘जयजयवंती’ सादर केला. त्यांना माधव मोडक (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), डॉ. अतींद्र सरवडीकर (स्वरमंडळ), अश्विनी मोडक, आरती ठाकूर कुंडलकर व चेतना बनावत (तानपुरा व गायनसाथ) यांनी साथसंगत केली.

सरतेशेवटी सवाई गंधर्व यांची ध्वनिमुद्रिका लावून महोत्सवाची सांगता करण्यात आली.

 

spot_img
Latest news
Related news