Pune SBI News : स्टेट बँकेकडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना पीपीई किटचे वाटप

पुणे महानगरपालिकेला 1200 पीपीई किट, पूना हॉस्पिटलला 400 एन-95 मास्क, पुणे शहर पोलिसांना 300 मास्क, 300 फेसशिल्ड, 300 सॅनिटायझर देण्यात आले.

एमपीसी न्यूज – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने पुणे विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या लढाईत सुरक्षेसाठी महत्वपूर्ण असलेले 100 पीपीई किट, 100 सॅनिटायझर, 100 फेस शिल्ड, 100 ज्यूट बॅग आदी साहित्य देण्यात आले.

याप्रसंगी ‘एसबीआय’चे उप महाप्रबंधक पी. शेषू बाबू यांच्या हस्ते हे सर्व साहित्य ‘सीआयएसएफ’चे डेप्युटी कमांडंट संतोष सुमन व असिस्टंट कमांडंट जी. जी. भार्गव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी बँकेचे रिजनल मॅनेजर मनीष चंद्रा, ब्रांच हेड एस. ए. शेंडे, मॅनेजर (लायजन) जयंत सिन्हा, शशिकला पाटील, कृष्णा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पी. शेषू बाबू यावेळी म्हणाले, स्टेट बँकेच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत नियमितपणे विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, कृषी विकास, जलसंवर्धन, वृक्षारोपण, ग्रामीण आर्थिक विकास आदी उपक्रम राबवले जात आहेत.

समाजाप्रती आपले योगदान असावे, या कर्तव्यभावनेतून अधिकाधिक मदतकार्य देण्याचा प्रयत्न नियमितपणे करत असते. यासह कोरोना महामारीच्या काळात बँकेच्या वतीने अखंडपणे आर्थिक सेवा पुरविली जात आहे.

‘एसबीआय’च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून जवळपास 200 कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधीला दिले आहेत. स्थानिकपासून राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचे काम बँकेने केले आहे.

कोरोना संकटात गरजुंना दिलासा मिळावा, यासाठी बँकेच्या वतीने पुणे शहर आणि ग्रामीण भागात अन्नधान्याचे वाटप केले. ‘इस्कॉन’च्या ‘अन्नामृत’ उपक्रमांत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 25 दिवस रोज 2500 लोकांना जेवण दिले गेले.

पुणे महानगरपालिकेला 1200 पीपीई किट, पूना हॉस्पिटलला 400 एन-95 मास्क, पुणे शहर पोलिसांना 300 मास्क, 300 फेसशिल्ड, 300 सॅनिटायझर देण्यात आले.

याशिवाय सर्व प्रकारची काळजी घेऊन ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. पुण्यातील तीन रुग्णालयांना व्हेन्टिलेटर्स दिले आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर देण्यात आले आहेत. बँकेच्या वर्धापनदिनी 5000 झाडे लावण्यात आली आहेत, असेही बाबू यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.