Pune : शालेय विद्यार्थ्यांनी सादर केले ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे प्रकल्प !

'आझम कॅम्पस' मध्ये अमेरिकन पाहुण्यांनी केले कौतुक  

एमपीसी न्यूज- सेन्सरचा वापर करून पाहिजे तेव्हा झाकण उघडून बंद करणारी डस्टबिन, मोबाईलवरून घराचे दिवे चालू बंद करण्याचे इलेक्ट्रॉनिक सर्किट अशा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित अनेक प्रकल्प शालेय विद्यार्थ्यांनी सादर केले आणि अमेरिकन पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार आय सी टी ‘ अकेडमीमधील सातवी -आठवी च्या ‘पै -परवाझ’ या विशेष तुकडीतील 5 विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प सादर केले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला.  अमेरिकास्थित कायदेतज्ज्ञ एड. फारुख सैत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे होते. हार्डवेअर इन्स्ट्रक्टर उजेफ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प तयार करण्यात आले. रबिया शेख, मुसाब सय्यद, अनास शेख, महक शेख, मंताषा बागवान यांनी हे प्रकल्प सादर केले.

“‘आर्टीफिशियल इंटेलिजन्स’ ,’इंटरनेट ऑन थिंग्ज ‘चा जमाना येत असताना शालेय विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून हे विषय कळावेत म्हणून आम्ही प्रोत्साहन देत आहोत आणि विशेष सुविधा उपलब्ध करून देत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञानात ही पिढी मागे राहू नये आणि ‘नाही रे ‘ वर्गापर्यंत माहिती -तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत” असे डॉ पी ए इनामदार यांनी सांगितले .

संस्थेतील शालेय विद्यार्थी संगणक प्रशिक्षण घेत आहेत, स्वतःचा इमेल आयडी वापरत आहेत, वेगवान टायपिंग करू शकतात, मोबाईल दुरुस्त करू शकतात आणि एमएससीआयटी परीक्षाही उत्तीर्ण होतात असे डॉ पी ए इनामदार यांनी सांगितले. त्यांच्यासाठी ई लर्निंग सुविधा असून एनिमेशन सॉफ्टवेअर वापरून अध्यापन केले जाते. संपूर्ण कॅम्पस वाय -फाय करण्यात आला असून सर्व पुस्तके, संदर्भ ग्रंथ पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ इनामदार यांनी दिली.

एड. फारुख सैत या अमेरिकन पाहुण्यांनी या प्रकल्पांचे आणि पुढाकाराचे कौतुक केले. पै -परवेझ तुकडीच्या प्रमुख मुमताज सय्यद, अरिफ सय्यद यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like