Pune : लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, पक्षीय बलाबल आणि ताकद पाहून जागांची मागणी केली जाणार – सुनील तटकरे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील प्रत्येक (Pune) लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, पक्षीय बलाबल आणि ताकद पाहून जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिली.

महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यानंतर दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होऊन मगच लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप ठरेल, असेही तटकरे यांनी सांगितले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय निवडणूक आयोग, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय तसेच आता पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी, संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधूनही राष्ट्रवादीमध्ये अनेक प्रवेश लवकरच होतील. त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होत आहे.

Chakan: मुलींना जाळ्यात ओढून फसवणारा गजाआड; महाळुंगे पोलिसांची कारवाई

माझे बंधू आणि मी 2014 पासून राजकारणातून वेगवेगळे झालो आहोत. त्यामुळे ते आताच सोडून गेले, अशा वदंता मुद्दामहून पसरवल्या जात आहेत. राजकारणामुळे कुटुंबात फूट पडणे हे भारतीय राजकारणात नवीन (Pune) नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी मतदार संघातून, जनतेमधून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीकडे असल्याने या जागेची मागणी आम्ही करणार आहोत. महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर बारामतीमधील उमेदवार जाहीर केला जाणार आहे. कधीतरी पहिली निवडणूक लढवावी लागतेच, त्याशिवाय अनुभव कसा येणार? सुप्रिया सुळे यांनी पहिली निवडणूक लढविली होती, तेव्हा त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता, असा टोलाही तटकरे यांनी खासदार सुळे यांना लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.