Pune : शाश्वत पाणी व्यवस्थापन विषयावर पुण्यात बुधवारपासून परिषद

राजेंद्र पवार, जलसंपदा विभागाचे सचिव यांची माहिती

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर वार्षिक दुसरी परिषद दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील हॉटेल हयात रिजेन्सी येथे आयोजित केली आहे. या परिषदेचे उदघाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प विभागाचे वरिष्ठ सहायक आयुक्त राकेश कश्यप, दीपक कुमार, यन. व्ही. शिंदे, व्ही. जी. रजपूत, राजेंद्र मोहिते उपस्थित होते. या परिषदेला जागतिक बँक तसेच सिंचन व निचरा विषयक कमिशनचे तज्ञ व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, युयसके, नेदरलँड, कॅनडा, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन, जर्मनी, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमधील आंतरराष्ट्रीय तज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये 12 तांत्रिक सत्र आयोजित केले आहेत. जलसंधारणाच्या उत्कृष्ट पद्धतीवर समर्पित एक पूर्ण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला 500 हुन अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी परिषदेचा समारोप राज्यमंत्री जलशक्ती रतन लाल कटारिया यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पाणी हे आपल्या देशाचे एक महत्वाचे संसाधन आहे. जगातील लोकसंख्येपैकी 18 टक्के लोकसंख्या भारतात आहे. तर, आपल्याकडे जगाच्या जल संसाधनांपैकी फक्त चार टक्के वाटा असून तोही मोठ्या प्रमाणात स्थानानुसार विखुरलेला आहे. जेव्हा आपल्याला परस्पर विरोधी क्षेत्रातील मागण्यांचे आव्हान पेलण्याची गरज भासते. तेव्हा परिस्थिती आणखी चिघळते. अशाप्रकारे योग्य रीतीने मौल्यवान जलसंपत्तीचे व्यवस्थापन करणे ही तातडीची गरज आहे, असेही पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.