Pune : ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 26 सप्टेंबर रोजी होणार सन्मान

एमपीसी न्यूज- पुण्यभूषण फाऊंडेशन’ (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ 2019 ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. गुरुवार,26 सप्टेंबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 वाजता होणाऱ्या शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली. एक लाख रूपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थीना गौरविण्यात येणार आहे.

पुरस्काराचे यंदाचे 31 वे वर्ष आहे. या सोहळ्यात एक वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक, सीमेवर लढताना जखमी झालेल्या तीन सैनिकांना आणि एका वीरमातेलाही या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. यात वीरमाता लता नायर, मोहम्मद चांदभाई शेख, नाईक फुलसिंग, हवालदार प्रमोद सपकाळ, हवालदार गोविंद बिरादार यांचा समावेश आहे.

पुण्यभूषण पुरस्कारार्थींचे नाव पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निश्चित केले. या वर्षीच्या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते. या तीन हुतात्म्यांची प्रेरणा समोर ठेवून ‘त्रिदल ‘ पुणे संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने हा पुरस्कार सुरु केला.

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्य्रक्रमास असलेल्या सुरक्षा नियमावलीमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी काँग्रेस भवन येथे वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी निमंत्रण पत्रिका सोबत ठेवाव्यात ,तसेच सकाळी साडे नऊच्या आत स्थानापन्न व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.