Pune : वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांची घेतली जातेय योग्य काळजी

0

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने चालविल्या जात असलेल्या ‘पिताश्री’ वृद्धाश्रमात कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेची तसेच आहाराची ट्रस्टच्या वतीने योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्गाला आणि तिथे रहात असलेल्या सर्व 60 ज्येष्ठ नागरिकांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. प्रत्येकाला खोलीतच चहा, न्याहारी, जेवण, त्यांची औषधे वगैरे पुरविले जातात. सर्व खोल्या, स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ करण्यात येत असतात. या काळात निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने फिनेलचा वापर करुन वेळोवेळी स्वच्छता केली जाते. येथे मोकळे वातावरण असून आवार मोठे आहे. ते आवारही एरवीप्रमाणेच आताही स्वच्छ राखले जात आहे.

जेवण बनविण्यापूर्वी कर्मचारी वर्ग सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवून मगच कामाला सुरुवात करतो. वृद्धाश्रमातील सर्वजणांची प्रकृती उत्तम असून त्यांना एकमेकांपासून स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन वृद्धाश्रमातील व्यक्तिंच्या संपर्कात बाहेरचे कोणी येऊ नये यासाठी बारकाईने काळजी घेतली जात असून वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक बाबासाहेब गव्हाणे यांची त्या सर्वांवर देखरेख आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी पदाधिकारी आणि विश्वस्त यांनी व्यवस्थापनाला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या असून तेथील कामकाजाचा नियमित आढावा घेतला जात आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like