Pune : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ (वय 84) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी दुपारी 2 ते 4 या वेळेत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विद्या बाळ या लेखिका आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. विद्या बाळ यांनी 1989  मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले. हे मासिक अल्पावधीत लोकप्रिय ठरले. या मासिकाद्वारे त्यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत समाज प्रबोधन केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. पुढे 1964 ते 1983 या दरम्यान त्यांनी स्त्री या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले.

लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रात स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्य सुरु केले. ‘सखी मंडळा’ची स्थापनाही केली. या माध्यमातून त्यांनी समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.