Pune : विनोद हे आपल्याला मिळालेले वरदान- प्रा. श्याम भुर्के

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यानाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘विनोद हे आपल्याला मिळालेले वरदान आहे,ते आपण योग्य वेळी वापरले तर आपण आनंदात राहू शकतो. असे मत प्रा.श्याम भुर्के यांनी व्यक्त केले. विनोदाची परंपरा मराठी भाषेत फार मोठी आहे, ती पुढे नेली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय ‘आर्टस सर्कल’ च्या माध्यमातून ‘जीवनातील विनोदाचे महत्व’ या विषयावर प्रा. शाम भुर्के यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठी साहित्यातील विनोदी लेखन,लेखक, वक्ते यांचे मजेदार प्रसंग सांगितले. मंगेश पाडगावकर यांच्या कविता, वात्रटिका सांगितल्या. पु. लं. च्या विनोदाचा स्थायीभाव म्हणजे उत्स्फुर्तता त्याची अनेक मजेशीर उदाहरणे त्यांनी दिली, तसेच राम गबाले, भीमसेन जोशी, पु.ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर व पुजारी यांच्या गप्पांमधील विनोदी किस्से श्याम भुर्के यांनी सांगितले

“आपल्याला माहित असलेले विनोद वरचेवर एकमेकांना सांगत रहाणे हे महत्वाचे आहे. मनुष्य हा लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो. पण, सर्वात महत्वाचे म्हणजे तो हसू शकतो हे मनुष्याचे भाग्य आहे’,असे प्रा. श्याम भुर्के यांनी सांगितले.आपण माणूस आहोत हे सिद्ध करायचे असेल तर आपण रोज हसले पाहिजे. दररोज एकतरी विनोद ऐकला पाहिजे, तरच जीवन आनंदी होईल.जो विनोदाकडे वळतो त्याचे मन निर्मळ होते. मन निर्मळ झाले की तो रागावत नाही”असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.श्याम भुर्के यांचा सत्कार महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोनाली ढमाळ यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. गौरी राव यांनी केले.हा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी दुपारी धनकवडी कॅम्पस मध्ये झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.