Pune : ‘डायलिसिस, बीपी, किडनी रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी’

काँग्रेस नेते उल्हास पवार आणि आबा बागुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार चालू असताना अन्य मोठे आजार असणाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ नये या करिता वेळेत उपचार घेणे अत्यंत आवश्यक असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते उल्हास पवार आणि आबा बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण तसेच या संसर्गाने प्रत्यक्षात बाधित झालेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्यात येत आहेत. चौदा दिवसांपर्यंत त्यांचे विलगीकरण करावे लागत असल्याने घरीच किंवा हॉस्पिटल्समधून त्यांची व्यवस्था करण्यात येते. प्रभाग, वॉर्ड, क्षेत्रीय कार्यालयनिहाय त्या-त्या भागातील ओपीडी चालविणाऱ्या डॉक्टर्स, रुग्णालये यांच्याकडे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी त्यांची जास्तीत जास्त काळजी घेण्यात येते. स्वाभाविकपणे डायबेटिस, बीपी, किडनी तसेच अन्य जुनाट (क्रोनिक) आजारांच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा आजारांच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यास त्यांनाही वेळेत उपचार घेता येतील.

आधीपासून डायबेटीस, बीपी, किडनी संदर्भातील त्रास अथवा अन्य काही गंभीर स्वरुपाच्या व्याधी झालेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचेही निदान झाल्यास त्यांच्या हातावर तसा शिक्का मारुन त्यांचे विलगीकरण करण्यात येते. असे रुग्ण औषधे आणण्यासाठी किंवा मूळ आजारावर उपचार करुन घेण्यासाठी बाहेर जावू शकत नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भात तपासणी करत असतानाच पेशंट्सकडून त्यांचे आजार, त्यावर सुरु असलेले उपचार याची संपूर्ण माहिती असलेली फाईल मागवून घ्यावी.

काही रुग्णांना नियमित डायलिसिसचे उपचार करुन घेणे गरजेचे असते. अशा रुग्णांसाठी त्यांच्या घरी, खासगी रुग्णालयांमध्ये अथवा जिथे त्यांना विलगीकरणाच्या कारणाने ठेवले असेल तिथे डायलिसिसची स्वतंत्र व्यवस्था करावी, जेणेकरुन असे रुग्ण उपचारांविना राहाणार नाहीत.

अन्यथा कोरोना वगळता अन्य गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या रुग्णांना योग्य उपचार वेळेत न मिळाल्यानेही त्यांचा मृत्यू संभवू शकतो. तसेच ती मोजदाद कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांसमवेत केली जाण्याची शक्यता वाटते. परिणामी कोरोनाबाधित मृतांचा आकडा वाढलेला दिसू शकतो असे त्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.