Pune : अॅसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज- अॅसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी तिचा रोज पाठलाग करून तिला त्रास देत होता. दररोज शाळेबाहेर थांबून पीडितेचा पाठलाग करत होता; तसेच, चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि तिच्या घरच्यांना मारण्याची धमकी देखील त्याने तिला दिली होती.

घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने वाघोली परिसरात नेले. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याचा व्हिडिओदेखील तयार केला. घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पीडितेला दिली. दरम्यान, आरोपीचा त्रास वाढत असल्याने पीडितेने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपाला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.